आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारणावादी नेते ली केकियांग चीनचे नवे पंतप्रधान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - सुधारणावादी कम्युनिस्ट नेते ली केकियांग यांची चीनच्या पंंतप्रधानपदी निवड करण्यात आली. जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमधील भ्रष्टाचाराची बजबजपुरी संपुष्टात आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ली यांच्या निवडीबरोबरच चीनमध्ये दहा वर्षांतून एकदा होणारी नेतृत्व बदलाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 57 वर्षीय ली हे इंग्रजी बोलणारे चिनी नोकरशहा असून मावळते पंतप्रधान वेन जियाबाओ यांच्या प्रशासनात ते उपपंतप्रधान होते. दशकभरानंतर चीनने सर्व पातळीवरील नेतृत्व बदलून टाकले आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या 3 हजार सदस्यांनी त्यांची पंतप्रधानपदी निवड केली.

नॅशनल पीपल्स काँग्रेस ही चीनची रबरी शिक्का संसद समजली जाते. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीपीसी) घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचा केवळ उपचार या संसदेत पूर्ण केला जातो. सत्ताधारी सीपीसीमधील पदानुक्रमानुसार अध्यक्ष शी जिनपिंग हे क्रमांक एकचे, तर ली हे क्रमांक दोनचे नेते आहेत. आता या दोघांच्या खांद्यांवर देशाची धुरा आहे. चिनी संसदेत 2,949 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ली यांना 99.7 टक्के मते मिळाली. तीन मते त्यांच्याविरोधात पडली, तर सहा सदस्य मतदानाला गैरहजर होते.

निवृत्तीनंतर चिनी नेते काय करतात?
हू जिंताओ यांच्या नेतृत्वात दशकभर चीनची धुरा वाहिलेले कम्युनिस्ट नेते नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीनंतर हे नेते नेमके काय करतात, याबाबतचे रहस्य अजूनही कायम असून काहींच्या मते हे नेते पक्षाच्या पडद्यामागच्या राजकारणात सक्रिय असतात, तर काहींच्या मते ते विश्रांती घेत कौटुंबिक जीवन जगत असतात. गेल्या दोन दशकांत झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर निवृत्तीनंतरही नेत्यांना वैभवशाली सोयी-सुविधा मिळाल्याचे पाहायला मिळाले, तर अध्यक्ष जियांग झेमीन हे निवृत्तीनंतरही शांघायमध्ये पक्षात मुख्य भूमिका बजावत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. वेन यांनी निवृत्तीनंतर राजकीय संन्यास घेऊन सांस्कृतिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून देण्याची घोषणा केली आहे. कारकीर्दीत झालेल्या गैरकृत्यांबद्दल पक्षाने आपल्यावर कारवाई करू नये म्हणून काही नेते पक्षात सक्रिय राहतात.