आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबियाच्या पंतप्रधानांचे अपहरण,पंचतारांकित हॉटेलमधून बंदूकधा-यांनी उचलून नेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपोली - लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचे गुरुवारी भल्या पहाटे अपहरण झाले. सुमारे दीडशे बंदूकधा-यांनी एका हॉटेलमध्ये घुसून त्यांना अज्ञात ठिकाणी उचलून नेले. पंतप्रधान नेमके कोठे आहेत, याचा कित्येक तास पत्ताच नव्हता. अखेर त्यांची सुटका करण्यात आली; परंतु त्यांच्या अपहरणनाट्याचे गूढ कायम असून देशाची सुरक्षा यंत्रणा पुरती हादरली आहे.


अली झिदान यांच्या अपहरणाच्या वृत्तानेच लिबियातील दिवस उजाडला. गद्दाफी यांच्यानंतर संक्रमण काळातील सरकारचे नेतृत्व करणा-या व्यक्तीचेच अपहरण झाल्याने सरकारमधील अनेक विभागांना धक्का बसला. संरक्षण विभागाकडून त्यांच्या अपहरणाच्या घटनेस दुजोरा देण्यात आला. त्यामुळे अनेक तास त्यांचा शोध घेण्यात आला, परंतु कसलीही माहिती मिळू शकली नाही. अखेर अनेक तासांनंतर झिदान यांची अपहरणकर्त्यांकडून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी सरळ पंतप्रधान कार्यालय गाठले.


बंदूकधा-यांचा घेराव
पंतप्रधान झिदान त्रिपोलीतील कॉरिनथिया हॉटेलमध्ये उतरलेले होते. गुरुवारी पहाटे काही बंदूकधारी हॉटेलमध्ये घुसले. त्यांना उचलून अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्याचे हॉटेलच्या प्रत्यक्षदर्शी कर्मचा-याने सांगितले. शंभराहून अधिक शस्त्रधा-यांनी त्यांना अगोदर घेरले होते, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. अन्य एका वृत्तानुसार बंदूकधा-यांची संख्या दीडशे होती.


शांतता राखण्याचे आवाहन
अपहरणामुळे समस्या निर्माण झाली होती. परंतु जनतेने शांतता ठेवावी, असे आवाहन झिदान यांनी केले आहे. ज्यांनी माझ्या सुटकेसाठी प्रयत्न केले, त्यांना मी मानवंदना देतो. लष्कर आणि पोलिसच देशाचे संरक्षण करू शकतात. आजची एखाद्या अपघातासारखी होती. लिबिया यातून पुन्हा सावरेल. पुन्हा सक्रिय आणि सकारात्मक देश म्हणून वाटचाल सुरू होईल, अशी अपेक्षाही झिदान यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचे थेट प्रसारण सरकारी टीव्हीवरून दाखवण्यात आले.


कारण काय ? : अमेरिकेने गेल्या आठवड्यात अल कायदाचा म्होरक्या अनास अल-लिबी याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यावरून देशातील कट्टरवाद्यांमध्ये संतापाची भावना होती. अमेरिकेने देशाच्या सार्वभौमत्वाला न जुमानता ही लष्करी कारवाई त्यांना आवडली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या बंडखोर गटाने पंतप्रधानांचेच अपहरण केल्याचे सांगण्यात येते.