आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Threat Pak President Asif Ali Zardari Ready To Quit Nation

पाकचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींच्या जिवाला धोका; पलायनाच्या तयारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - जिवाला धोका आणि भ्रष्टाचाराच्या खटल्याची टांगती तलवार असल्यामुळे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी देशातून पलायन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा कालावधी 8 सप्टेंबरला संपणार आहे. अर्थात जेमतेम दोन महिने ते मायदेशी मुक्कामी आहेत. तूर्त सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी स्वत: ला तळघरात कोंडून घेतले आहे.

झरदारी यांच्या मित्रपरिवाराने त्यांना पाकिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर ते गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामागे जिवे मारण्याच्या धमकीचे कारण सांगितले जात आहे, असे वृत्त पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’ ने दिले आहे. देश सोडून जाण्यामागील आणखी एक कारण भ्रष्टाचार सांगितले जाते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील खटले सुरू करण्याचे आदेश अगोदरच दिले आहेत. स्वित्झर्लंडमधील हे खटले देशात चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. सुरक्षेच्या तीनतेरा वाजवणार्‍या अनेक घटना घडल्यामुळे झरदारींनी गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक ठिकाणी जाणेही टाळले. निवासस्थानाच्या तळघरात राहण्यालाच ते प्राधान्य देतात. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी संपल्यानंतर ते कुटुंबासह पाकिस्तान सोडतील, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या एका नेत्याने सांगितले. दरम्यान, पुढील राष्ट्राध्यक्ष निवडणूक आपण लढवणार नसल्याचे झरदारींनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे परदेशातून ते पक्षावर नियंत्रण ठेवतील, असे पीपीपीच्या सूत्रांनी सांगितले. देशात 11 मे रोजी नवाझ शरीफ यांचा पीएमएल (एन) पक्ष बहुमताने सत्तेवर आला आहे.


0 कायद्याचे कवच जाणार
पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर झरदारींना राष्ट्राध्यक्ष म्हणून मिळालेले कायद्याचे सुरक्षा कवच निघून जाणार आहे. पायउतार झाल्यानंतर त्यांना नवाझ शरीफ सरकारकडून सुरक्षेची हमी मिळणे अशक्य आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही त्याची झळ बसू शकते. त्यामुळेच त्यांनी जिवाच्या भीतीने मायदेशातून पलायन करण्याचा मार्ग निवडला आहे. ते कुटुंबासह निघून जाणार आहेत. कायदा सल्लागारांनीही त्यांना हेच सुचवले आहे.


0 सुरक्षा रक्षकांच्या हत्या
पाकिस्तानात झरदारींच्या जिवाला धोका आहे. अलीकडचे बिलाल शेख या सुरक्षा अधिकार्‍याचीही हत्या झाली. त्यापूर्वी त्यांचा प्रमुख सुरक्षा रक्षक खालिद शहेनशहा याच्यावर सन 2008 मध्ये कराचीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर हल्ला झाला होता. सन 2011 मध्येही त्याची पुनरावृत्ती झाली. भुर्त्तो कुटुंबीयांचा आणखी एक सुरक्षा अधिकारी इमरान जांगी याची कराचीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.


पीपीपीवर झरदारींचा रिमोट कंट्रोल
पाकिस्तानी पीपल्स पार्टीवर परदेशातून नियंत्रण ठेवतील. पक्षाची सूत्रे आपला मुलगा बिलावल भुर्त्तोकडे सोपवण्याचे संकेत त्यांनी आधीच दिले आहेत.

दुबई भेट
जानेवारीत लष्कर व सरकार यांच्यातील संघर्षानंतर झरदारी यांनी दुबईला पलायन केले होते. देशाला लष्करशहाचा इतिहास असल्याने ते लष्कराच्या भीतीपोटी दुबईला जाऊन बसले होते, मात्र दुबईत ते हृदयविकारावर उपचार घेत असल्याचे सांगून या प्रकरणाची सारवासारव करण्यात आली होती.
बिलावल भुत्ते-झरदारी