आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये दिवसाढवळ्या लूट ;दोघांना भरचौकात फाशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - तेहरानच्या रस्त्यावर एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करताना आढळलेल्या दोघांना रविवारी भरचौकात फासावर लटकवण्यात आले. गेल्या महिन्यात यूट्यूबवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे ‘इन्सा न्यूज’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

इराणच्या रिव्होल्यूशनरी कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर सुमारे 300 लोकांच्या जमावासमोर आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार 3 वाजता या दोघांना भरचौकात फासावर लटकवण्यात आले. अलिरेजा माफिहा आणि महंमद अली सरौरी अशी फासावर लटकवण्यात आलेल्या दोघांची नावे असून त्यांना मोहरेबेह म्हणजेच ईश्वराविरुद्ध युद्ध पुकारणे आणि भूतलावर भ्रष्ट आचरण करण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. इराणच्या इस्लामिक शरिया कायद्यानुसार गुन्ह्यामध्ये बंदूक, सुरा, कोयता वापरणे हा ईश्वराविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा समजण्यात येतो. तेहराणच्या रस्त्यावर मोटारसायकलवर आलेल्या या दोघांसह अन्य दोन जण एका व्यक्तीवर हल्ला करून त्याच्याकडील पैसे, बॅग आणि कोट हिसकावून घेत असल्याचा व्हिडिओ 6 डिसेंबर रोजी यूट्यूबवर प्रसिद्ध झाल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली होती. अन्य दोघांना 10 वर्षे कैद, 74 फटके आणि पाच वर्षे विजनवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.