आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलालाच्या कार्यास ओबामांचा सलाम, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे खास निमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी मलाला युसूफझाई हिची भेट घेतली. मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या लढ्याबद्दल राष्ट्राध्यक्षांनी मलालाचे कौतुक आणि सलाम केला.
व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात ओबामा उभयतांनी मलालाचे स्वागत केले आणि भेटीसाठी आल्याबद्दल आभारही व्यक्त केले. मलालाने केलेले काम मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणा देणारे आहे. शुक्रवारी त्यांनी मलालाची भेट घेतली. मुलींच्या शिक्षणावरील गुंतवणूक ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण त्याचे पालन केले पाहिजे. अर्थात केवळ आपल्या मुलींपुरतेच नव्हे तर नात, किंबहुना त्यांच्या कुटुंबांसाठी, समुदायासाठी, देशांसाठी आपण काहीतरी नक्कीच केले पाहिजे, अशी भावना मिशेल ओबामा यांनी व्यक्त केली. हा दिवस आंतरराष्ट्रीय कन्या दिन आहे. प्रत्येक खंडात असलेल्या मुलींना जग बदलण्याची इच्छा आहे. परंतु त्यांना असे स्वप्न पाहू दिले पाहिजे. मलालाच्या प्रयत्नाला आम्ही सलाम करतो. तिच्या धाडसामुळे जगभरातील मुलींची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील. मुली एक दिवस आपल्या देशाचे नेतृत्व करतील. त्यासाठी त्यांना केवळ एक संधी देण्याची गरज आहे. त्या स्वत:चे नशीब घडवतील, अशा शब्दांत ओबामा यांनी आशावाद व्यक्त केला.

ड्रोनवर चिंता : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानते. परंतु दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी करण्यात येणार्‍या ड्रोन हल्ल्याबद्दल मला चिंता वाटते. कारण अशा हल्ल्यांमुळे सामान्य पाकिस्तानी नागरिक धास्तावलेला असतो. असे हल्ले बंद झाले तर शिक्षणाच्या कार्यावर नव्याने लक्ष देता येऊ शकते, असे मलालाने भेटीदरम्यान सांगितले.