आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malayasia Airlines News In Marathi, Hindi Ocean, Divya Marathi

मलेशियन विमानाचा थांगपत्ता लागेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता विमान हिंदी महासागरात कोसळले असावे, असा तपास करणा-या अधिका-यांचा कयास आहे. 26 देशांचे तपास पथक या विमानाच्या शोधमोहिमेवर आहे. या विमानाबाबत दररोजच नवीन तर्कवितर्क लढवले जात असले तरी त्याचा थांगपत्ता मात्र दृष्टिपथात दिसेनासा झाला आहे.


तपास करणा-या अधिका-यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. ‘बोइंग 777-200 ईआर’ हे 239 प्रवासी घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाल्यापासून तब्बल 26 देश त्याचा दोन मोठ्या प्रदेशांमध्ये शोध घेत आहेत. लाओसपासून कॅस्पियन समुद्रापर्यंतच्या उत्तर भागात एकीकडे तपास चालू आहे, तर दुसरीकडे पश्चिम इंडोनेशियापासून ते पश्चिम ऑस्ट्रेलियापर्यंत संपूर्ण हिंदी महासागरात तपास करण्यात येत आहे.


हे विमान दक्षिणेला गेले आणि पुढे ते त्या मार्गाच्या दक्षिण टोकाला गेले, असे तपासामागील गृहीतक असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तरेकडील देशांच्या हवाई हद्दीत ते विमान गेल्याचा कोणताही पुरावा नाही, तसेच दक्षिण हद्दीच्या वरच्या भागातील तपासामध्ये विमानाचे अवशेष सापडले नाहीत. यावरून वरील गृहीतक मानून तपास करण्यात येत आहे.


अमेरिकेचा नकार : मलेशियन विमान हिंदी महासागराच्या दिएगो गार्सिआ येथील अमेरिकी तळावर उतरले असल्याची शक्यता अमेरिकेने फेटाळून लावली आहे. चिनी माध्यमांनी ही शक्यता वर्तवली होती. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जय कार्ने यांनी या शक्यता फोल असल्याचे म्हटले आहे. यासंबंधीच्या तपासात मलेशियन सरकारसोबत अमेरिकन अधिकारी सहकार्य करत आहेत. इतर सहकारी राष्ट्रांसोबत अमेरिकाही सर्व शक्यतांची पडताळणी करत आहे.
सिम्युलेटरमधील काही डाटा डिलिट
वैमानिकाच्या फ्लाइट सिम्युलेटरमधील काही फाइल्स डिलिट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या फाइल्स परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास विमान बेपत्ता होण्याचे रहस्य उघड होण्यास मदत मिळेल, असा दावा संरक्षण आणि वाहतूक मंत्री हिशमुद्दीन हुसेन यांनी केला. सिम्युलेटमधील काही डाटा 3 फेब्रुवारी रोजी डिलिट करण्यात आल्याचे सांगण्यात येते.


उपग्रह माहिती उपलब्ध
विमान सकाळी आठ वाजेपर्यंत उड्डाण करत होते, अशी माहिती उपग्रहामार्फत प्राप्त झाली आहे. नेमके काय झाले हे समजण्यासाठी विमान आणि त्याच्या ब्लॅक बॉक्सच्या प्रतीक्षेत आहोत, असे हवाई वाहतूक मंत्री अझरुद्दीन रहमान यांनी सांगितले. वैमानिकाने पूर्वनियोजित मार्गावरून विमान वळवले नव्हते. विमानाच्या तपासाची माहिती देण्यासाठी मलेशिया सरकार बीजिंगला उच्च्स्तरीय शिष्टमंडळ पाठवणार आहे.