आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airlines Accident News In Marathi, China

अनेक देश बचाव कार्यात सक्रिय मात्र विमानाचा शोध लागेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर- गेल्या पाच दिवसांपासून दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध घेऊनही हाती फारसे काही लागले नाही. शेवटचा संपर्क झाला त्या ठिकाणापासून 185 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रफळ भागात विमान, जहाजांचा ताफा तपास कार्यात गुंतला आहे. प्रवाशांची अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे मलेशियाच्या लष्कराने विमानाचे अवशेष पाहिल्याचा दावा केला आहे.

पाच दिवसांपूर्वी मलेशियन प्रवासी विमान बेपत्ता झाले. तेव्हापासून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हे विमान 239 जणांना घेऊन बीजिंगच्या दिशेने निघाले होते. विमानाचा शेवटचा संपर्क झाला, त्या ठिकाणापासून 185 किलोमीटरच्या परिघात तपास केला जात आहे. दुसरीकडे विमानातील दोन संशयित घुसखोरांची ओळख पटली आहे. यातील एक 19 वर्षीय असून तो चोरीच्या पासपोर्टवर प्रवास करत होता. त्याचा संबंध दहशतवाद्यांशी नसल्याचे तपास अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. पुरिआ नूर मोहंमद मेहरदाद व काझीम अली अशी या दोन प्रवाशांची नावे आहेत, दरम्यान, बीजिंगकडे जाणार्‍या 777-200 विमानातून पाच भारतीयांसह 227 प्रवासी आणि 12 विमान कर्मचारी प्रवास करत होते. चेतना कोळेकर (55), स्वानंद कोळेकर (23), विनोद कोळेकर (59) , चंद्रिका शर्मा (51), क्रांती शिरसाट (44) अशी विमानातील भारतीय प्रवाशांची नावे आहेत.

कोणकोणत्या देशांचे प्रवासी?
०भारत 05
०चीन 154
०मलेशिया 38
०इंडोनेशिया 07
०ऑस्ट्रेलिया 06
०अमेरिका 04
०कॅनडा 02

> 40 जहाजे आणि तपास अधिकार्‍यांचा ताफा.
> 34 विमाने
> 14 देश तपास मोहिमेत सहभागी.

शोधाचे प्रयत्न सुरू आहेत, जेट सापडणे कठीण वाटत नाही
मलेशियन विमान समुद्रात पडले आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. ते निश्चितपणे सापडेल. गायब झालेले विमान शोधण्याची ही आमची पहिली वेळ नाही. या अगोदरही आम्ही अनेक विमानांच्या शोधकार्यात सहभागी झालो होतो. गेल्या 25 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. जेटला शोधणे कठीण काम नसते. स्मार्टफोनमुळे लोकेशन लवकरच सापडेल.
- कॅप्टन जॉन एम. कॉक्स, तपास मोहिमेतील अधिकारी.

सेलफोनची रिंग का वाजतेय ?
मलेशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांचा शोध घेतला जात असताना नातेवाइकांनी मात्र वेगळ्याच प्रकारचा दावा केला आहे. विमानातील प्रवाशांच्या मोबाइलची बेल वाजत असल्याचा दावा काही नातेवाइकांनी सोमवारी केला. ऑनलाइनदेखील हे मोबाइल अ‍ॅक्टिव्ह असल्याचे चिनी सोशल नेटवर्किंग सेवेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चिनी डॉट ऑर्गच्या म्हणण्यानुसार 19 नातेवाइकांनी अशा प्रकारचा दावा केला.