आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysian Passenger Airline Crashes In Ukrain, Divya Marathi

मलेशियन विमानावर क्षेपणास्त्र हल्ला, 295 ठार, बघा विदारक PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव/ क्वालालंपूर - मलेशियन एअरलाइन्सच्या प्रवासी विमानावर युक्रेनमध्ये गुरुवारी रात्री अतिरेक्यांनी क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात विमानातील 80 मुलांसह सर्व 295 प्रवासी ठार झाले. मृतांत एका अनिवासी भारतीयाचा समावेश आहे. मूळ पंजाबचे संजितसिंग संधू यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

रशिया समर्थक बंडखोरांनी हा हल्ला केल्याचा युक्रेन सरकारचा दावा आहे. या हल्ल्यामुळे दबाव वाढताच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तत्काळ अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी बोलून स्पष्टीकरण दिले. या घटनेशी घेणे-देणे नसल्याचा रशियाचा दावा आहे. तिकडे ओबामा यांनी व्हाइट हाऊसला मलेशियाच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले. अ‍ॅमस्टरडमहून निघालेल्या बोइंग 777 श्रेणीतील या विमानात 280 प्रवासी आणि चालक दलाचे 15 सदस्य क्वालालंपूरला जात होते. मलेशियाचे अध्यक्ष नजीब रजाक यांनी चौकशीचे आदेश दिले.

अशी घडली दुर्घटना
मलेशियन एअरलाइन्सचे एमएच 17 हे विमान पूर्व युक्रेनच्या दोनेत्सक प्रदेशात सुमारे 33 हजार फूट उंचीवर होते. मॉस्कोच्या वेळेनुसार विमान गुरुवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी रशियामध्ये दाखल होणार होते. रशियन सीमेच्या 60 किलोमीटर अलीकडेच विमानावर क्षेपणास्त्र डागण्यात आले.

संशयाची सुई रशियाकडेही
विमानावर बीयूके क्षेपणास्त्र लाँचरने हल्ला झाला. ही क्षेपणास्त्र प्रणाली फक्त रशियाकडेच आहे. युक्रेनच्या बंडखोरांना रशियन लष्कर युद्धसामग्री पुरवत आहे. त्यामुळे हा हल्ला बंडखोरांनीच केल्याच्या दाव्याला पुष्टी मिळते. हे प्रवासी विमान युक्रेनचे लढाऊ विमान समजून बंडखोरांनी क्षेपणास्त्र डागल्याचे म्हटले जात आहे. रशिया समर्थक बंडखोरांनी बुधवारीही युक्रेनची दोन जेट विमाने पाडली होती.

4 महिन्यांत दुसरी घटना
यापूर्वी क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे विमान बेपत्ता झाले होते. अनेक महिने शोधूनही विमानाचा किंवा त्यातील 240 प्रवाशांचा थांगपत्ता लागलेला नाही. शेवटी त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले. आजपर्यंत विमानाचे अवशेषही सापडलेले नाहीत. विशेष म्हणजे ते विमानही बोइंग 777 श्रेणीचेच होते.

भारतासह अनेक देशांच्या विमानांनी मार्ग बदलले
इंडियन एअर लाइन्सव एअर इंडिया या भारतीय विमान कंपन्यांसह सह लुफ्तांसा, एअर फ्रान्ससह अनेक देशांच्या विमान कंपन्यांनी युक्रेनच्या हवाई हद्दीतून विमान उड्डाणे न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा हल्ल्यानंतरची विमानाची छायाचित्रे....