सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या सॅटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमध्ये आढळून आलेल्या मलेशियाच्या बेपत्ता विमानाच्या संभाव्य अवशेषांच्या ठिकाणी एक कार्गो जहाज पोहोचले आहे, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉट यांनी हिंदी महासागरातील संभाव्य अवशेषांची माहिती आज संसदेला दिली होती.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, एका कार कॅरिअर मेडागास्टर येथून मेलबोर्नला जात होते. संभाव्य अवशेष असलेल्या हिंदी महासागरातील ठिकाणाजवळ हे जहाज असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे जहाजाच्या मार्गात बदल करण्यास सांगण्यात आले असून संभाव्य अवशेषांच्या ठिकाणी जाण्यास जहाजाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. हे जहाज आता या ठिकाणी पोहोचले असून अवशेषांची तपासणी करणार आहे. त्यानंतर या अवशेषांच्या रहस्यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे.
हिंदी महासागरातील दूरवरच्या भागात मलेशियाच्या बेपत्ता विमानाचे संभाव्य अवशेष आढळून आल्याची प्राथमिक माहिती आज सकाळी ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचे संभाव्य अवशेष आढळून आले असून त्यांचा शोध घेण्यासाठी चार लष्करी विमाने पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, छायाचित्रांच्या माध्यमातून विश्वासार्ह दुवे सापडलेले आहेत, अशी माहिती मलेशियाच्या प्रशासनाने दिली आहे.
सॅटेलाईटच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये आढळून आलेले एक ऑब्जेक्ट 24 मीटर लांबीचे (तब्बल 80 फूट) तर दुसरे ऑब्जेक्ट 5 मीटर लांबीचे (15 फूट) असल्याचे आढळून आले आहे. परंतु, हे ऑब्जेक्ट बेपत्ता विमानाचेच आहेत, असे आताच सांगता येणे कठिण आहे. समुद्रावर आढळून येणाऱ्या कचऱ्याचे ते भागही असू शकतात, असे ऑस्ट्रेलियन मरिटाईम सेफ्टी अथॉरीटीच्या इमरजन्सी रिस्पॉन्स डिव्हिजनचे व्यवस्थापक जॉन यंग यांनी सांगितले आहे.
यंग म्हणाले, की सध्या आम्हाला एवढीच माहिती मिळाली आहे. परंतु, आतापर्यंत मिळालेल्या माहितीत ही विश्वासार्ह आहे. ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय समुद्रकिनाऱ्यावरून या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे चार तास लागू शकतात.
समुद्रातील या ठिकाणाहून कार्गो व्हेईकल्ससुद्धा प्रवास करीत असतात. त्यामुळे सॅटेलाईटच्या इमेजरीत आढळून आलेले ऑब्जेक्ट कार्गो व्हेईकल्समधील कंटेनरही राहू शकतात. आम्ही सर्व शक्यतांवर काम करीत आहोत.
दरम्यान, छायाचित्रांमुळे शोध मोहिमेला विश्वासार्ह दुवे सापडले आहेत. छायाचित्रात दिसणारे ऑब्जेक्ट विमानाचे अपशेष आहेत, की नाही हे पडताळून पाहण्यासाठी रात्रभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती मलेशियाचे वाहतूक मंत्री हिशाउद्दिन हुसैन यांनी दिली आहे.
सॅटेलाईट इमेजरीतील छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...