आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेरियावर उपचारांसाठी क्रांतिकारी औषधाचा शोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन- मलेरियावरील उपचारांत वापरली जाणारी औषधे दिवसेंदिवस निष्प्रभ होत चालल्याने चिंतित असलेल्या वैद्यकीय जगताला ‘सिनरियम’ नावाच्या नव्या औषधाचा शोध लागला असून, भारतात त्याचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
नेब्रास्का मेडिकल सेंटर विद्यापीठातील (यूएनएमसी) शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन क्रांतिकारी असल्याचा दावा केला जात आहे. 2000 ते 2010 दरम्यान या औषधाचे संयुग शोधणाºया आंतरराष्ट्रीय पथकाचे प्रमुख जोनाथन व्हेनरस्ट्रॉम यांनी सांगितले की, मलेरियामुळे होणारे मृत्यू रोखण्यात हे औषध महत्त्वाची भूमिका बजावेल. दरवर्षी जगभरात 200 दशलक्ष लोक मलेरियामुळे मृत्युमुखी पडतात. यावरून या संशाधनाचे महत्त्व लक्षात येते.
जोनाथन मागील 25 वर्षांपासून मलेरियावर संशोधन करीत असून, जिनेव्हा येथील ना-नफा तत्त्वावर काम करणाºया मेडिसिन फॉर मलेरिया व्हेंचर (एमएमव्ही) या संघटनेने त्यांच्या प्रकल्पासाठी 12 दशलक्ष डॉलरचे अनुदान दिल्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडूनही एमएमव्हीला 60 टक्के निधी मिळाला आहे.
शास्त्रज्ञांच्या या पथकात स्विस ट्रॉपिकल अँड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्युट आणि आॅस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा समावेश होता. एमएमव्हीचे मुख्य संशोधन अधिकारी टीम वेल्स म्हणाले की, एखादे औषध यशस्वी होईल की नाही याबद्दल काहीही सांगणे अवघड असते. भारतातील प्रौढांवर सिनरियमचा वापर करून या संशोधनातील तिसरा टप्पा पूर्ण करणे आणि भारतीय नियामक संस्थांची मंजुरी मिळवणे हे फार मोठे यश होते. आफ्रिकेतील रुग्ण आणि लहान मुलांवर या औषधाचा काय परिणाम होतो याची आणखी माहिती आम्ही घेत आहोत. व्हेनरस्ट्रॉम आणि त्यांच्या पथकाने मलेरियावर यापेक्षाही चांगले औषध शोधून काढले असून एमएमव्ही बँकॉक येथे त्यावर वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. हे नवे औषध शरीरात जास्त काळ राहते. त्यामुळे तीन वेळा घेण्याऐवजी ते एकदा घेतले तरी पुरेसे ठरेल. जे रुग्ण औषधे घ्यायला विसरतात त्यांना याचा फायदा होईल, असे व्हेनरस्ट्रॉम म्हणाले.
न जेवताही घेता येते गोळी- सिनरियममधील महत्त्वाचा घटक आर्टेरोलेन हे एक सिंथेटिक औषध असल्याची माहिती यूएनएमसीचे अधिष्ठाता कोर्टनी फ्लेचर यांनी दिली. ते म्हणाले की, आर्टेरोलेन सिंथेटिक असल्यामुळे ते तयार करण्यासाठी कुठल्याही वनस्पतीची गरज नाही. त्यामुळे ते स्वस्तात तयार होते. जास्त परिणामकारक, स्वस्त आणि कमी साइड इफेक्ट असलेल्या या औषधाची एक गोळी दिवसातून तीन वेळा घ्यावी लागते. गोळी घेण्याआधी काहीही खाण्याची गरज नाही.