आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष आणि नोबेल पुरस्कार विजेते नेल्सन मंडेला यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंडेला (94) यांची प्रकृती फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाल्यामुळे खालावली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांचे प्रवक्ते मॅक महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे दीडच्या सुमारास मंडेला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालवल्यानंतर त्यांना प्रिटोरिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. त्यांच्या फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांत मंडेला यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वेळी मार्चच्या अखेरीस त्यांना दहा दिवसांच्या उपचारानंतर 6 एप्रिलला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते 18 दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रीयाही करण्यात आली होती.
दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी लढ्याचे नेतृत्व मंडेला यांनी केले होते. मंडेला यांनी 27 वर्षे तुरुंगवास भोगला. त्यानंतर 1994 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झाले. पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर मंडेला यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेने भूषविले होते. त्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास मंडेला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते एकाही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थितीत राहीलेले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.