आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्‍यासाठी संघर्ष करत असलेल्या मंडेलांच्या कुटूंबात वारसाहक्कावरून संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - वर्णभेदाविरुद्ध संघर्ष करून कृष्णवर्णीयांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्योदय आणणारे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या जीवनातील शेवटच्या घटका अत्यंत क्लेशदायक आणि या उत्तुंग व्यक्तिमत्त्वासाठी अपमानास्पद ठरल्या आहेत. व्हेंटिलेटरच्या साहाय्याने जिवंत ठेवण्यात आलेल्या
मंडेलांसाठी देशभर प्रार्थना केली जात असतानाच त्यांच्या कुटुंबात वारसाहक्कावरून निर्माण झालेला गृहकलह दिवसेंदिवस गंभीर वळण घेत आहे. मंडेला यांनी तीन विवाह केले. जागतिक नावलौकिक मिळालेल्या या नेत्याकडे संपत्तीही मोठी आहे. मंडेला आणि त्यांची तीन मृत मुले यांच्या शेवटच्या विश्रांतीच्या ठिकाणाबाबतची न्यायालयीन लढाई हरल्यानंतर मंडेला यांचे नातू मांडला मंडेला यांनी अन्य कुटुंबीयांविरोधात जनतेच्या दरबारात कैफियत मांडण्यास सुरुवात केली आहे.


मांडला यांनी म्बुसू आणि अँडिले या आपल्या दोन भावांचे पितृत्व आणि तिसरा भाऊ दाबाच्या मातृत्वावरच शंका घेतली आहे. शिवाय स्वत:चा मुलगाही आपला भाऊ आणि माजी पत्नीच्या संबंधातून जन्माला आलेली अनौरस संतती असल्याचे म्हटले आहे. म्बुसूपासूनच माझ्या पत्नीला गर्भ राहिला होता, असा दावा त्याने दक्षिण आफ्रिकेतील दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात केला.


नेमका वाद काय ?
मंडेला यांचे नातू 39 वर्षीय मांडला मंडेला यांच्याकडे कुनू येथे मंडेलांची तीन मृत मुले आणि स्वत:च्या पित्याचे अवशेष होते. नेल्सन मंडेला कुनू येथेच लहानाचे मोठे झाले. वारसाहक्काचा झगडा उभा राहिल्यानंतर हे अवशेष खोदून काढून मवेझो येथे पुन्हा पुरण्यात आले. मवेझो हे मंडेला यांचे जन्मस्थळ आहे. मुलांचे मृतदेह कुनू येथेच दफन करण्यात यावे, ही आपल्या आजोबांची इच्छा होती, तरीही त्यांच्या इच्छेविरुद्ध सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून मुलांचे अवशेष मवेझो येथे पुरण्यात आले. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर हे अवशेष काल गुरुवारी कुनू येथे पुन्हा पुरण्यात आले.


मंडेलांच्या प्रकृतिबाबत उलटसुलट चर्चा
नेल्सन मंडेला यांच्या प्रकृतीवरून देशभरात उलटसूलट चर्चा सुरू आहे. मात्र त्यांची प्रकृती गंभीर परंतु स्थिर असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने शुक्रवारी जाहीर केले. त्यांची स्थिती ‘ अचेतन ’(व्हेजिटेटिव्ह) असल्याचे म्हणणा-या डॉक्टरांनी नंतर न्यायालयात हा शब्दप्रयोग मागे घेतला. दुसरीकडे त्यांचे मित्र डेनिस गोल्डबर्ग यांच्या मते मंडेला यांचे सर्व अवयव कार्यरत आहेत.


मंडेलांचा कुटुंबकबिला
> नेल्सन मंडेला यांनी तीन वेळा विवाह केला आहे.
> 1944 मध्ये एव्हलीन मेसबरोबर झालेला त्यांचा विवाह मार्च 1958 मध्ये संपुष्टात आला. त्यांना चार मुले होती : थेम्बी (24 व्या वर्षी 1969 मध्ये मृत्यू), मॅकझीव (1948 मध्ये नवव्या महिन्यातच मृत्यू), मॅगकोथा (2005 मध्ये एड्सने मृत्यू) आणि अन्य एक मुलगी मॅकझीव सध्या ती 59 वर्षांची आहे.
> मंडेला 1958 मध्ये विनी या दुस-या पत्नीशी विवाहबद्ध झाले. त्यांना झेनानी आणि जिंदझी अशा दोन मुली आहेत.
>1996 मध्ये विनीशी घटस्फोट झाल्यानंतर (विन्नी सध्या विन्नी मॅडिकिझेला-मंडेला या नावाने ओळखली जाते.) मंडेला यांनी 1998 मध्ये 80 व्या वाढदिवशी ग्रेसा मॅशेल हिच्याशी विवाह केला. मॅशेल ही मोझांबिकचे माजी अध्यक्ष समोरा मॅशेल यांची विधवा पत्नी आहे.
> मंडेला यांना 17 नातू आणि 14 पणतू आहेत.
>सध्या वादाचा केंद्रबिंदू असलेला नातू मांडला हा मंडेला यांना पहिल्या पत्नीपासून झालेला मॅगकोथाचा
मुलगा आहे.


कुणीही यावे अन् टिकली मारून जावे
या घडीला कोणीही येतो आणि मी मंडेलांचा वारस आहे असा दावा करतो. थेम्बू आदिवासींच्या वारसाने आपणच कायदेशीर प्रमुख आहोत, असे मंडेला यांनीही मान्य केले आहे.
-मांडला मंडेला, मंडेलांचे नातू