आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmohansingh Firstly Meet New Chiese President Jiping In Brics Meet

चीनमधील बांधकामांबद्दल मनमोहन सिंग यांनी व्‍यक्त केली चिंता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डर्बन - ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बुधवारी प्रथमच भेट झाली.25 मिनिटांच्या भेटीत सरहद्दीचा वाद,पाणीप्रश्नासह विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. उभय देशांतील संबंध आणखी मजबूत करण्याचा संकल्प दोन्ही नेत्यांनी केला. त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा नदीवरील नव्या तीन धरणांचा मुद्दाही पंतप्रधानांनी छेडला.

ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधत असलेल्या तीन धरणांमुळे नदीचा प्रवाह खंडित होऊन भारतात पाणी येणार नाही अशी चिंता पंतप्रधानांनी नव्या राष्ट्राध्यक्षांकडे बोलून दाखवली. दहा वर्षांनंतर चीनमध्ये झालेल्या खांदेपालटानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट होती. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिनपिंग यांचे अभिनंदन करून गेल्या दशकात पंतप्रधान म्हणून चिनी नेत्यांशी नियमित संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले अशा शब्दात मनमोहनसिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,तर सिंग हे एक उत्तम मुत्सद्दी आहेत. उभय देशांतील संबंध मजबूत करण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे, असे प्रशंसोद्गार जिनपिंग यांनी काढले. ब्रिक्स व इतर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने गेल्या काही वर्षात माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिआबाओ या दोन्ही नेत्यांसमवेत पंतप्रधानांची एकूण 14 वेळा भेट झाली.


भारताची चिंता
चीनच्या कब्जातील तिबेट प्रदेशात उगम असणारी ब्रह्मपुत्रा भारतातील अरुणाचल व आसाममधून बांगलादेशपर्यंत वाहते. या नदीवर झांगमू हे धरण आहे. आता दागू,जिआचा आणि जिएक्झू ही आणखी तीन धरणे बांधण्यात येणार आहेत.


चीनचा दावा
ही धरणे बांधल्यास नदीचा प्रवाह खंडित होऊन आसाम, अरुणाचलची अपरिमित हानी होणार आहे. ही चिंता भारताला असताना चीनने मात्र हे प्रकल्प म्हणजे प्रवाहावर आधारित असले तरीही त्यात पाणी अडवले जाणार नाही असा दावा चीनने केला आहे.


चर्चेचे विषय
* दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली नाही.
* सीमावाद, व्यापार आदी मुद्यांवर व्यापक चर्चा. मैत्री आणखी घट्ट करण्यावर भर.
* राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे भारत दौ-याचे निमंत्रण पंतप्रधानांनी दिले. जिनपिंग यांच्याकडून निमंत्रणाचा स्वीकार.
* पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही चीन दौ-याचे निमंत्रण. यावर्षी दौरा होण्याची शक्यता.


लष्करी सहकार्य
सुरक्षेच्या मुद्द्यावर दोन्ही देशांच्या लष्करात विश्वास वृद्धीसाठी लष्करी सहकार्य वाढवण्याचे आवाहन जिनपिंग यांनी केले.सरहद्दीचा वाद सोडवण्यासाठी विशेष दूतांमार्फत बोलणी करण्यात यावी असे ते म्हणाले.