Home »International »Bhaskar Gyan» Many Advantages Of Wiriting

हाताने लिहिण्‍याचे फायदे अनेक

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 19, 2013, 06:33 AM IST

  • हाताने लिहिण्‍याचे फायदे अनेक

लाखो लोकांप्रमाणे तुम्हालाही कॉम्प्युटरवर टायपिंग करण्याची, स्क्रीनवर स्वाइप करण्याची किंवा टचपॅडवर काम करण्याची सवय जडली असेल. हाताने लिहिण्याचे प्रमाण खूप कमी असेल किंवा बंदच असेल. त्यामुळे तुमचे हस्ताक्षर बिघडलेच असेल, पण त्यासोबत इतरही अनेक फायद्याच्या गोष्टी तुम्ही गमावल्या आहेत. हातात पेन किंवा पेन्सिल घेऊन लिहिण्याचे अनेक फायदे असतात, हे अनेक पुराव्यांनी सिद्ध झाले आहे. जाणून घेऊयात असे काही फायदे-
1. स्मरणशक्ती वाढवते- एखादी गोष्टी तुम्ही कागदावर लिहिली असता तुमच्या मेंदूतील रेटिक्युलर अ‍ॅक्टिव्हेटिंग सेंटर (आरएसी) सक्रिय होते. ज्या गोष्टींचे मेंदूला विश्लेषण करायचे असते, त्यासाठी आरएसी एखाद्या फिल्टरप्रमाणे काम करते. त्यामुळे त्या वेळी तुम्ही ज्या गोष्टीवर काम करत आहात, त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित होते. 2010 मध्ये झालेल्या एका अध्ययनात आढळून आले की, लहान मुलांना जेव्हा ‘स्पेसशिप’सारखे शब्द हाताने लिहायला सांगितले तेव्हा ते या शब्दाशी अधिक जोडले गेले.
2. उत्कृष्ट लेखक बनू शकता- अनेक प्रसिद्ध लेखक टाइपरायटर किंवा कॉम्प्युटर असूनही चांगल्या लेखनासाठी हाताने लिहिण्याला प्राधान्य देतात. सुसन सोनटॅग या लेखिका सांगतात की, त्या आधी पेन किंवा पेन्सिलने कागदावर लिहितात. त्यानंतर त्याचे संपादन करताना ते टाइप करतात. 2009 मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षही या लेखिकेच्या विचारसरणीशी मिळतेजुळते आले. संशोधनात आढळून आले की, शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी पेनने निबंध लिहिला त्यांचा निबंध टायपिंग करणा-या मुलांपेक्षा जास्त वेगाने पूर्ण झाला.
3. लक्ष विचलित होत नाही- कॉम्प्युटरसमोर काम केल्याने वेळ वाया जातो, कारण तुम्ही त्यावर व्हिडिओ वगैरे पाहू लागता. 2012 मध्ये न्यूरोसायंटिस्ट्सनी सांगितले होते की, पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन ट्रंबलर किंवा बजफीड ब्राउज केल्यास तुमच्यातील सृजनशीलता वाढते, पण लोक फेसबुकसारख्या सामान्य पोर्टल्सलाच प्राधान्य देतात. याउलट तुम्ही पेन किंवा कागदाने लिहायला बसल्यास तुमचे लक्ष चालू विषयावरून इतरत्र कोठेही विचलित होऊ शकत नाही.
4. उतारवयातही मेंदू तल्लख राहतो - हाताने लिहिणे हा एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार काही फिजिशियन दावा करतात की, हाताने लिहिणे हे तुमच्या हालचालींसाठी किंवा स्मरणशक्तीसाठी लाभदायक आहे. यामुळे उतारवयातही मेंदू तल्लख राहतो. 2008 मध्ये जर्नल ऑ फ कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार वयोवृद्ध लोक हाताने लिहिण्यात आलेल्या चिनी भाषांमधील अक्षर किंवा गणितातील चिन्हे किंवा संगीतातील स्वरचिन्हे कॉम्प्युटरवरील अक्षरांच्या तुलनेत लवकर ओळखतात.
Bmetalfloss.com

Next Article

Recommended