आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • McCain Urges US To End Military Aid To Egypt As 36 Die In Clashes

इजिप्तमध्ये हिंसाचारात 36 ठार, राष्ट्राध्यक्ष-लष्करप्रमुखांत चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - इजिप्तमधील सत्तांतरानंतर देशातील हिंसाचार वाढत चालला आहे. शनिवारी मुर्सी समर्थक व विरोधक यांच्यातील धुमश्चक्रीत 36 जण ठार झाले. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची हमी देण्यासाठी अंतरिम राष्ट्राध्यक्ष अदल मन्सूर व लष्करप्रमुखांत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

मन्सूर यांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर मुर्सी यांच्या पायउतार होण्यावरून असलेला वाद अद्याप थांबलेला नाही. शनिवारीदेखील हिंसाचाराची मालिका सुरूच राहिली. त्यातील मृतांची संख्या 36 वर पोहोचली आहे तर एक हजारावर नागरिक जखमी झाले आहेत. देशातील हिंसाचार रोखण्यासाठी मन्सूर यांनी शनिवारी लष्करप्रमुख तथा संरक्षणमंत्री अब्देल-फत्ताह अल-सिस्सी यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी राज्यघटनेचे सल्लागार न्यायाधीश अल अवाद सालेह, राजकीय सल्लागार मुस्तफा हेगाझी, सुरक्षा सल्लागार राफात शेहाता या नवीन सहकार्‍यांशीदेखील चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. देशातील सुरक्षा वाढवणे, नागरिकांना त्याबाबत आश्वस्त करण्याबद्दल राष्ट्राध्यक्षांनी अधिकार्‍यांना सूचना केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहुडचे उपाध्यक्ष व राष्ट्राध्यक्ष पदाचे माजी उमेदवार खैरत अल-शटार यांना अटक करण्यात आली आहे. शटार हे श्रीमंत उद्योजकही आहेत.

हजारोंची निदर्शने
लष्कराच्या जोरावर सत्तेवर आलेल्या मन्सूर यांनी तत्काळ पायउतार व्हावे, अशी मागणी करत हजारो मुर्सी समर्थकांनी राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. लष्कराकडून गर्दी करू नये, असा इशारा देण्यात आलेला असतानाही रिपब्लिकन गार्ड्स क्लबच्या बाहेर मुर्सी यांचे छायाचित्र हाती घेतलेल्या समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. लष्कराचे मुख्यालय असलेल्या या इमारतीमध्ये मुर्सी यांना बुधवारपासून जवानांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची सुटका करण्याची मागणी या वेळी निदर्शकांनी केली.

बंडखोरांना भेटणार
देशातील हिंसाचार थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मन्सूर यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहेत. त्या शिवाय बंडखोर गटांशी देखील चर्चा केली जाणार आहे.