टोकियो - माणसाच्या भावना, संवेदना आणि हावभाव चपखलपणे समजून घेणारा आणि त्यानुसार कृती करणारा ‘पेपर’ नावाचा रोबोट सॉफ्टबँक या जपानच्या मोबाइल कंपनीने फ्रान्सच्या अलदेबरन रोबोटिक्सच्या सहकार्याने तयार केला आहे. भावना आणि संवेदना असणारा रोबोटच्या इतिहासातील हा पहिलाच रोबोट ठरणार आहे.
का भासली गरज?
जपानमध्ये म्हातार्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे तर दुसरीकडे जन्मदर घटू लागला आहे. त्यामुळे मानवी भावना समजून घेऊन कामे करणार्या रोबोटची गरज जाणवू लागली होती. त्या गरजेतून पेपरचा जन्म.
फायदा कोणाला?
कामगारांची घटती संख्या आणि वाढती मजुरी यामुळे हैराण असलेल्या व्यापार्यांसाठीही रोबोट वरदान ठरणार आहे. त्याचप्रमाणे घरातील वडीलधार्यांच्या देखभालीसाठी माणसाची गरज भासणार्या कुटुंबांनाही हा रोबोट मोठा आधार ठरणार आहे.
कसे चालते रोबोटचे काम?
मानवी भावना समजण्यासाठी पेपर रोबोट त्याच्यामध्ये असलेल्या इमोशनल इंजिनचा वापर करतो. त्याच्यामध्ये माणसाचे हावभाव, इशारे आणि बोलण्याचा ढंग आत्मसात करण्याचे गुप्त तंत्रही रोबोटमध्ये असल्याने ते सगळे समजून घेऊन तो माणसांशी बोलतो.