आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MH 17 Crash Planes Carrying Bodies Of Victims Head To Netherlands

PHOTO - शहीदांप्रमाणे आणले एमएच 17मधील प्रवाशांचे मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंडोवन विमानतळावरून प्रवाशांचे मृतदेह घेऊन येणारा वाहनांचा ताफा
खारकीव- हवाई क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झालेल्या मलेशियन विमानातील 40 प्रवाशांचे मृतदेह बुधवारी नेदरलँडमध्ये आणण्यात आले. या प्रवाशांत दोनतृतीयांश म्हणजे सुमारे 193 नागरिक नेदरलँडचे होते.

देशात बुधवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. दोन लष्करी विमानांनी मृतदेह नेदरलँडमध्ये दाखल होताच अवघ्या देशावर शोककळा पसरली. देशभर दोन मिनिटे स्तब्धता पाळून मृतांना आदरांजली वाहण्यात आली. मायभूमीचा निरोप घेण्यासाठी मृतदेहांना जणू पुन्हा एकदा मृत्यूला सामोरे जावे लागले! प्रवाशांचे नातेवाईक आणि डच राजघराणे शोकसागरात बुडाले. श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले होते. पहिल्या फेरीत लाकडी शवपेट्यांमध्ये 40 मृतदेह दोन खास विमानांनी नेदरलँडला पाठवण्यात आले. यापैकी एक विमान ऑस्ट्रेलियाचे होते. आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून रशिया समर्थक युक्रेन बंडखोरांनी मृतदेह परतवले असले, तरी मृतदेहांचे अनेक अवशेष अजूनही घटनास्थळी पडल्याची माहिती तपास अधिकार्‍यांनी दिली आहे.

चुकीने विमान उडवले, अमेरिकी अधिकार्‍यांचे मत
युक्रेन लष्कराचे समजून प्रवासी विमानावर निशाणा
विमानावर निशाणा साधणार्‍या बंडखोरांना रशियानेच प्रशिक्षण दिले होते, असे तपास मोहिमेतील गुप्तचर अधिकार्‍यांनी सांगितले. उपग्रहाद्वारे घेतलेल्या अनेक छायाचित्रांद्वारे क्षेपणास्त्राचा मार्ग, दिशा व प्रक्षेपणाचे स्थान याचा अभ्यास केला. मात्र, हे विमान युक्रेन लष्कराचे असावे, या गैरसमजातून बंडखोरांनी क्षेपणास्त्र सोडल्याचा निष्कर्षही अधिकार्‍यांनी काढला आहे.

चुकीने साधला निशाणा?
काही क्षणांत 298 प्रवाशांचे प्राण घेणारा हा हल्ला हेतुपुरस्सर झाला नाही, असा शोध अमेरिकन अधिकार्‍यांनी लावला आहे. अमेरिकन अधिकार्‍यांच्या मते, रशियन समर्थक बंडखोरांकडून चुकीने या विमानावर निशाणा साधला असावा. अधिकार्‍यांना मिळालेल्या पुराव्यानुसार बंडखोरांनी एस ए-11 हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र सोडले. मात्र ही मोहीम फत्ते करणारी व्यक्ती अप्रशिक्षित होती. त्यामुळे चुकीने मलेशियन विमानावर निशाणा लागला. अशा प्रकारची घटना 1983 मध्ये घडल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

ब्लॅक बॉक्स ब्रिटनकडे, डीएनएवरून ओळख
क्वालालंपूर- मलेशियन एमएच 17 विमानाचे दोन ब्लॅक बॉक्स युक्रेन सरकारकडून ब्रिटन हवाई तपास अधिकार्‍यांकडे पुढील तपासासाठी पाठवण्यात येणार आहेत. या ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या कॉकपिटमधील संवादाचा डाटा असल्याने तपास कार्यात मोठे पुरावे मिळण्याची शक्यता आहे. मृतदेहांची ओळख पटण्यासाठी डच पथकाने घटनास्थळावरून डीएनए नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

बंडखोरांनी युक्रेनच्या दोन लढाऊ विमानांना पाडले
कीव- रशियन समर्थक बंडखोरांनी बुधवारी युक्रेनच्या लष्कराच्या दोन लढाऊ विमानांवर हल्ला करून ते पाडले. ही घटना मलेशियन विमान एमएच 17 पाडण्यात आलेल्या ठिकाणापासून केवळ 25 किलोमीटर अंतरावर घडली. दोन्ही सुखोई एसयू-2 विमानांच्या वैमानिकांची माहिती मिळू शकली नाही. परंतु वैमानिक पॅराशूटने सुरक्षित ठिकाणी उतरल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.