आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Brown Shooting: Protests Against Ferguson Grand Jury Decision Spread Across America

अमेरिकेत हिंसाचार; फर्ग्युसन, फिलाडेल्फिया, लॉस एंजलिसमध्ये जाळपोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्ग्युसन - अमेरिकेच्या मिसोरी राज्यातील फर्ग्युसन शहरात १८ वर्षीय कृष्णीवर्णीय युवकाच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने श्वेतवर्णीय पोलिसाविरुद्ध खटला न चालवण्याचा निकाल दिल्यानंतर अमेरिकेत विविध शहरांत कृष्णवर्णीय जमाव रस्त्यावर उतरला आहे. फर्ग्युसनमध्ये पोलिस वाहन, दुकाने व घरांना आग लावण्यात आली. या प्रकरणी ६१ जणांना अटक करण्यात आली. फिलाडेल्फिया, लॉस एंजलिस, न्यूयॉर्कमध्येही आंदोलन करण्यात आले.

संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सेंट लुईस उपनगरात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. न्यूयॉर्कमध्ये टाइम्स चौकात वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. शिकागोमध्ये नागरिकांनी मृत मायकेल ब्राऊनला न्याय द्या या आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. ग्रँट ज्युरीच्या निकालानंतर बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांवर दगडफेक व काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. फर्ग्युसनमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

कुटुंबीयांचे आवाहन
मृत युवक मायकेल ब्राऊनच्या कुटंबीयाने या निकालावर नाराजी व्यक्त करत लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तुमचा संताप सकारात्मक बदलामध्ये रूपांतरित करा. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ब्राऊन कुटंुबीयाने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

श्वेतवर्णीय जास्त
ग्रँड ज्युरीच्या १२ सदस्यांमध्ये ९ श्वेतवर्णीय तर ३ कृष्णवर्णीयांचा समावेश होता. निकालाची घोषणा करताना ग्रँड ज्युरीने म्हटले की, ग्रँड ज्युरीने सर्व पुराव्यांची चौकशी केली. ६० साक्षीदारांचे जबाब ऐकले आणि अनेक दिवसांनंतरच्या विचारविनिमयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑगस्टमध्ये हत्या
९ ऑगस्ट २०१४ रोजी मायकेल ब्राऊनने एका दुकानातून बळजबरीने सिगारेट पाकीट उचलले होते. या वेळी तिथे उपस्थित पोलिस अधिकारी डॅरेन विल्सनने त्याला समज दिली. मात्र त्याने त्यास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर विल्सन यांनी मायकेलवर गोळी झाडली.

फर्ग्युसनमध्ये ७० टक्के कृष्णवर्णीय
फर्ग्युसन शहरात ७० टक्के लोकसंख्या कृष्णवर्णीय तर ३० टक्के श्वेतवर्णीय आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांच्या ५३ सदस्यांमध्ये केवळ तीन कृष्णवर्णीय आहेत. ग्रँड ज्युरीच्या स्थापनेवरही प्रश्न केला जात आहे.

शांतता राखा : ओबामा
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देशवासीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ब्राऊनचे कुटंुबीय, समाजाचे लोक, नेते आणि धर्मगुरूंच्या आवाहनाकडे लक्ष द्या. काही निवडक ठिकाणच्या हिंसाचाराला ठळक प्रसिद्धी देणार्‍या टीव्हीवरील वृत्तांकनावर लक्ष देऊ नका.