आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये ३१ डिसेंबर २०१२ रोजी बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थी सॉविक पाल (१९) याचा मृतदेह ग्रेट मॅनचेस्टर पोलिसांना एका कालव्याजवळ सापडला. मुळचा भारतीय असलेला सॉविक बंगळुरूचा रहिवासी होता. तो मेट्रोपॉलिटन विद्यापीठात शिक्षण घेत होता. त्याचा मृतदेह ओल्ड ट्रॅफर्ड येथील ब्रिजवॉटर कलव्याजवळ सापडला. पोलिसांनी तो मृतदेह बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा असल्याचे सांगितले आहे. त्याच्या मित्रांनी त्याला शेवटचे ओल्ड ट्रॅफर्डच्या वेअरहाऊस प्रोजेक्ट नाईटक्लबमध्ये पाहिले होते. तेव्हा पासून त्याला कोणी पाहिलेले नव्हते.

पोलिसांना मंगळवारी ब्रिजवॉटर कालव्याजवळ एक प्रेत सापडले, ते सॉविकचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजून त्याचे शवविच्छेदन झालेले नाही, त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकलेले नाही. पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, सॉविकच्या कुटुंबियांना कळविण्यात आले आहे. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत. सॉविकच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्याच्या रुमपार्टनरने दुस-या दिवशी अर्थात १ जानेवारी रोजी दिली होती. त्यानंतर सॉविकची शोधाशोध सुरु झाली.

सॉविकचे वडील शंतनु पाल त्याच्या शोधात बंगळुरुहून मॅनचेस्टरला दाखल झाले होते. त्याचा शोध घेण्यासाठी फुटबॉल मॅच दरम्यान त्याचे छायाचित्र दाखवण्यात आले होते आणि त्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याशिवाय मॅनचेस्टर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी रॅलीही काढली होती.