(फोटोः संग्रहित छायाचित्र. हिंदी महासागरात राबविण्यात येत असलेली शोध मोहिम.)
सिडनी (ऑस्ट्रेलिया)- बेपत्ता मलेशियन विमान दुर्घटनेच्या वेळी ऑटोपायलट मोडवर होते, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंद महासागराच्या संभाव्य ठिकाणांपासून दक्षिण भागाच्या दिशेने शोध मोहिम हलविण्यात आली आहे, अशीही माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यासंदर्भात ऑस्ट्रेलियाचे दळणवळणमंत्री कॅनबेरा येथे म्हणाले, की फ्लाईट 370 बाबत सॅटेलाईट्सनी दिलेल्या ताज्या माहितीच्या आधारावर संभाव्य ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता या ठिकाणी शोध मोहिम राबविली जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोचे प्रमुख म्हणाले, की यापूर्वी सॅटेलाईट्सनी दाखविलेल्या संभाव्य जागी अंडरवॉटर ड्रोनने सुमारे 850 स्केअर किलोमीटर समुद्राचा परिसर पिंजुन काढला होता. तरीही शोध मोहिमेला यश आले नव्हते. त्यामुळे संभाव्य ठिकाणांमध्ये बदल करणे अनिवार्य झाले होते.
239 प्रवासी आणि क्रू कर्मचाऱ्यांना क्वालालंपूर येथून बिजिंगला घेऊन जात असलेले मलेशियाचे विमान 8 मार्च रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर मोठी शोध मोहिम राबवून संभाव्य ठिकाणी तपासणी करण्यात आली. तरीही या विमानाचे अवशेष अद्याप सापडले नाहीत.