आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Appeal For Make In India At ASIAN Conference

कम मेक इन इंडिया, आसियान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - आसियान परिषदेत नरेंद्र मोदी यांच्यासह डावीकडून म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थिन सिन, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक, ब्रुनेईचे सुलतान हसानल बोलकिया.
ने पेईटॉ - भारताला आसियान सदस्य राष्ट्रांसोबत व्यापार आणि आर्थिक पातळीवर दृढ संबंध निर्माण करण्याची इच्छा आहे. म्हणूनच भारत आणि आसियान ‘चांगले भागीदार ’ होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करून ‘कम मेक इन इंडिया’ असे नवीन आर्थिक विकासाचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेसोबत भारत आपले संबंध आणखी बळकट करू इच्छितो. या माध्यमातून प्रादेशिक पातळीवर शांतता आणि स्थैर्य येऊ शकेल. आसियान देश हे भारताचे शेजारी आहेत. त्याचबरोबर परस्परांमध्ये पारंपरिक अशी व्यापारी, धार्मिक-कला, संस्कृती असे संबंध आहेत. ही पार्श्वभूमी सर्व आग्नेय आशियाई देशांना आधुनिक काळात परस्परांशी जोडणारा ठरतो, असे मोदी यांनी म्हटले आहे. २५ व्या आसियान परिषदेला बुधवारी सुरुवात झाली. उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. पार्श्वभूमी समान असल्याने जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जवळपास सारखाच आहे. परस्परांतील विश्वास बळकट आहे. म्हणूनच आता संघटनेतील देशांनी संधी आणि आव्हानांना सामोरे गेले पाहिजे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. म्यानमारच्या राजधानीतील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, मोदी दहा दिवसांच्या या दौ-यामध्ये तीन देशांना भेटी देणार असून ऑस्ट्रेलियामध्ये "जी-२०’ राष्ट्रांच्या संमेलनातही भाग घेतील.
मलेशिया-थायलंडच्या कंपन्यांना आवतन
पंतप्रधान मोदी यांनी मलेशिया व थायलंडच्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना भारताशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा करून गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. ‘मेक इन इंडिया’वर ते खूप भर देत आहेत. मलेशियन कंपन्यांनी भारतात निमंत्रित करू इच्छितो, असे मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांच्या बोलताना सांगितले. ‘मलेशिया आणि भारताने आतापर्यंत एकत्रितपणे काम केले आहे. तुमच्या नेतृत्वाखाली हे संबंध आपण अधिक पुढे नेऊ शकतो’, असे ते म्हणाले. थायलंडच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल मोदी यांनी प्रयुत चान चा यांचे अभिनंदन केले. आपले संबंध अधिक बळकट होतील, असा विश्वास आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. थायलंडच्या पंतप्रधानांना मोदी यांनी या वेळी भारत भेटीचे निमंत्रण दिले.
पूर्वेला प्राधान्य
माझे सरकार सत्तेवर येऊन केवळ सहा महिने झाले आहेत; परंतु सरकारने एवढ्या अल्पावधीत पूर्वेकडील प्रदेशात अधिक लक्ष घातले आहे. सर्व क्षेत्रांत प्राधान्य देण्याचे काम झपाट्याने केले जात आहे. ते सहा महिन्यांत दिसून आले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर भारत आणि आशियातील देशांचा वेगाने विकास व्हायला व्हावा.
मोदी @ इन्स्टाग्राम, ३८ हजार फॉलोअर्स
सोशल नेटवर्किंगमध्ये सक्रिय असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘इंस्टाग्रॅम‘वरही आपले अकाउंट सुरू केले. ‘आसियान’ शिखर परिषदेच्या ठिकाणावरून मोदी यांनी ‘इन्स्टाग्राम’वर पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले. ‘हॅलो वर्ल्ड! ग्रेट बीइंग ऑन इन्स्टाग्राम. ‘आसियान’ शिखर परिषदेतील हे छायाचित्र आहे, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणा-या इन्स्टाग्रामवर मोदींनी पहिले छायाचित्र टाकल्यानंतर काही मिनिटांतच त्यांना ३८ हजार फॉलोअर्स मिळाले. पंतप्रधान मोदी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रतिक्रियाही आल्या.
भारत-आसियान व्यापार
सध्या : ७६ अब्ज डॉलर
उद्दिष्ट (२०१५ पर्यंत) : १०० अब्ज डॉलर
आसियान एकूण लोकसंख्या : एकूण १.८ अब्ज