आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Faces Controversial Flag Picture In Queensland University

मोदींसमोर भारताचा वादग्रस्त नकाशा, काश्मीर गायब होते, क्वीन्सलँड विद्यापीठातील गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौ-याची शुक्रवारी वादग्रस्त सुरुवात झाली. क्वीन्सलँड तंत्र विद्यापीठात पंतप्रधानांच्या समोर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये भारताचा वादग्रस्त नकाशा दाखवण्यात आला होता. त्यात जम्मू-काश्मीर प्रदेश गायब होता. त्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आयोजकांनी आपल्या कृतीबद्दल माफी मागितली. दरम्यान, पाच दिवसांच्या दौ-यात मोदी जी-२० देशांच्या शिखर बैठकीत काळ्या पैशांचा मुद्दा जोरकसपणे मांडणार आहेत.
परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आयोजकांनी प्रेझेंटेशनमधील वादग्रस्त नकाशा बाजूला काढला. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांना दिली. दुसरीकडे जी-२० च्या शिखर परिषदेला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. वाढती बेरोजगारी आणि विकास या मुद्द्यावरदेखील मोदी शिखर परिषदेच्या व्यासपीठावर जागतिक नेत्यांचे लक्ष वेधणार आहेत. दौ-यातील दोन दिवस ते शिखर परिषदेत सहभागी होऊन भारताला चिंता वाटणा-या इत्यादी विषयांना मांडतील.

काळ्या पैशाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्परांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे मोदी यांनी टि्वट करून स्पष्ट केले आहे. म्यानमार येथून रात्रभर प्रवास करून मोदी यांचे शुक्रवारी ब्रिस्बेनमध्ये आगमन झाले. एअर इंडियाच्या विशेष विमानाने ते दाखल झाले. क्वीन्सलँडचे प्रमुख कॅम्पबेल न्यूमन यांनी त्यांचे स्वागत केले. त्याशिवाय उच्चायुक्त बिरेन नंदाही उपस्थित होते. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. १९८६ मध्ये राजीव गांधी यांनी या देशाचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियासोबत ते मंगळवारी द्विपक्षीय चर्चा करतील. कॅनबेरा येथे पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे.
जी-२० शिखर परिषद आजपासून
जपानकडून रात्रीभोज
नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रेलियात झालेले स्वागत अभूतपूर्व होते. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्या वतीने मोदी यांच्यासाठी रात्री भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनाच्या माध्यमातून जपान-भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी अॅबे यांनी मोदी यांना निमंत्रण दिल्याचे सांगण्यात येते.
योग दिनासाठी ईयूचा पाठिंबा
नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या संकल्पनेला युरोपियन राष्ट्र संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची मोदींची कल्पना आहे. त्याला १३० देशांचा पाठिंबा आहे.
रशियन जहाजे तैनात
युक्रेनवरून दबाव वाढण्याअगोदरच रशियाने ऑस्ट्रेलिया किनारपट्टीवर चार युद्धनौका तैनात केल्या आहेत. आम्ही जेथे जातो, तेथे ही जहाजे तर असणारच, असे रशियाने सुनावले. त्यावरून परिषदेत हा मुद्दा गाजणार हे स्पष्ट आहे.