आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Will Be Headach Before America, Time Magazine Opinion

मोदींचे संभाव्य पंतप्रधानपद अमेरिकेसमोर डोकेदुखी, टाइम मासिकाचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय हा भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संघर्षाचे आणखी एक कारण बनू शकतो, असे अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मॅगझीनने म्हटले आहे. देवयानी खोब्रागडे प्रकरणामुळे आधीच उभय देशांतील तणाव वाढला आहे, मोदींचा व्हिसा वाद हा नवी डोकेदुखी ठरणार आहे.
टाइमच्या ताज्या अंकात वरिष्ठ प्रतिनिधी मायकेल क्राउली यांनी लोकसभा निवडणुकीनंतरच्या संभाव्य घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. राजनैतिक संरक्षण घेऊन देवयानी मायदेशी परतल्या असल्या तरीही उभय देशांतील संबंध अद्यापही पूर्वपदावर आलेले नाहीत. ते तत्काळ पूर्वपदावर येतील याची शक्यताही नाही. उलट एका मान्यवराच्या व्हिसामुळे वातावरण आणखी बिघडू शकते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप वरचढ ठरण्याची शक्यता आहे. भाजप जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार, परंतु गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीमुळे मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. अमेरिकेत ते ‘पर्सोना नॉन ग्रेटा’ आहेत, असे क्राउली यांनी म्हटले आहे.
गुजरात दंगलीच्या वेळेस मोदींनी हिंसाचारास प्रोत्साहन दिले, असा विरोधकांचा आरोप आहे. मोदींनी हे आरोप फेटाळले आहेतच, शिवाय कोणत्याही न्यायालयाने मोदींवर अद्याप ठपका ठेवलेला नाही. परंतु सन 2005 मध्ये अमेरिकी प्रशासनाने त्यांचा व्हिसा रद्द केला होता. धार्मिक स्वातंत्र्याची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गळचेपी करणा-या परदेशी व्यक्तीचा व्हिसा अमेरिकी कायद्यानुसार रद्द करता येतो. राष्ट्रीय राजकारणात मोदींचा वावर नव्हता तोपर्यंत ही बंदी तशी गैरलागूच होती, परंतु यापुढे भारत देशाच्या नेत्याला वॉशिंग्टन काळ्या यादीत टाकू शकेल का, असा सवाल क्राउली यांनी केला आहे.
...तर ओबामांवर दबाव वाढेल
मोदी पंतप्रधान झाल्यास ओबामा प्रशासनावर देश व परदेशातून दबाव वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी राष्ट्राध्यक्ष ओबामाही तत्त्वापेक्षा देशहित डोळ्यासमोर ठेवून (अर्थात मोदींचे स्वागत) निर्णय घेण्याचीच अधिक शक्यता आहे. मोदींना व्हिसा नाकारून गुजरात दंगलीबद्दलच्या भावना अमेरिकेने पोहोचवल्या आहेत. परंतु उभय देशांतील संबंध त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत, अशी सूचना क्राउली यांनी केली आहे.
अमेरिकी तज्ज्ञांमध्येच व्हिसावरून मतभेद
मोदींच्या व्हिसावरून परराष्ट्र धोरण ठरवणा-या अमेरिकी तज्ज्ञांमध्येच मतभेद आहेत. सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकी काँग्रेसने मोदींना पुन्हा मनाई केली आहे. या ठरावास दोन मुस्लिमांसह 43 संसद सदस्यांचा पाठिंबा आहे, तर राजकीय वास्तवाचे भान असलेले तज्ज्ञ व उद्योगजगत मोदींना पायघड्या घालण्यासाठी उत्सुक आहेत. परकीय गुंतवणुकीबाबत त्यांचे खुले धोरण उद्योगजगताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.