आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - फेसबुकवर जास्त मित्र असतील तर समाजोपयोगी कार्यासाठी केले जाणारे माहितीचे आदानप्रदान फारसे होत नाही, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. वार्विक विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापक किंबर्ले स्कार्फ यांनी सांगितले की, आपले ऑनलाइन सोशल नेटवर्क खूप विस्तारलेले असते तेव्हा एखाद्या कार्यासाठी मदत किंवा दान करण्याबाबत माहिती एकमेकांना देण्यासाठी आपण ब-याचदा इतरांच्या भरवशावर राहतो. त्यापेक्षा समान आवडीनिवड असणा-या लहान गटात अशा माहितीची देवाणघेवाण तत्काळ होते आणि त्याचा उपयोगही होतो, असे आढळून आले आहे.
किंबर्ले यांनी दान करण्याचे एक आर्थिक प्रारूप तयार केले असून यात सोशल नेटवर्किंगवरील शेजा-यांची एकात एक गुंतलेली वर्तुळे आहेत. किंबर्ले म्हणाल्या की, समजा फेसबुकवर माझे काही मित्र आहेत आणि त्या मित्रांचेही काही मित्र आहेत आणि असा प्रचंड विस्तार आहे. अशा वेळी एखाद्या समाजकार्यासाठी दान करण्याचे आवाहन करण्यात येते तेव्हा ही माहिती किती वेगाने पसरवली जाते याचा अभ्यास मला करायचा होता. अशा विशाल नेटवर्कमध्ये माहिती परस्परांना देण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते. त्यासाठी स्वत: काही प्रयत्न करण्याचे टाळले जाते. त्याचप्रमाणे दान करण्याची वेळ येते तेव्हाही लोक इतर कुणीतरी दान करील, अशी अपेक्षा करतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे समान आवडीनिवडीमुळे एकत्र आलेले गट अशा समाजकार्यासाठी उपयुक्त ठरतात. मोठ्या गटाच्या गोंधळात ही माहिती कुठे हरवून जाते कळतही नाही. 16 ते 19 ऑगस्टदरम्यान ड्रेस्डेन येथे होणा-या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पब्लिक फायनान्स परिषदेत हा रिसर्च पेपर प्रा. किंबर्ले वाचणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.