ह्युस्टन (अमेरिका)- नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी एका दक्षिण आशियायी महिलेने 3 वर्षांच्या चिमुकल्याला कारमध्ये कोंडून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या जिवाला धोका पोहोचविल्याचा आरोप या 24 वर्षीय महिलेवर ठेवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.
याबाबत येथील हॅरिस काऊंटीच्या शेरिफ कार्यालयाने सांगितले, की या महिलेचे नावा उझमा शेख असे आहे. ती ईशान्य हॅरिस काऊंटी परिसरातील नाईट क्लबमध्ये तिच्या 3 वर्षांच्या चिमुरड्यासह गेली होती. यावेळी नाईट क्लबच्या डोअर किपरने तिला मुलासह आत येण्याची मनाई केली. त्यानंतर जरा वेळाने ती पुन्हा नाईट क्लबमध्ये आली. यावेळी तिने डोअर किपरला सांगितले, की तिने तिच्या मित्राकडे मुलाला ठेवले आहे.
परंतु, महिलेच्या खुलाशावर डोअर किपरला संशय आला. त्याने नाईट क्लबबाहेर असलेली महिलेची कार तपासली. त्यावेळी तीन वर्षांचा चिमुकला त्यात आढळून आला. चिमुकल्याच्या जिवाला धोका पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेवर ठेवण्यात आला आहे.
2,000 अमेरिकी डॉलरच्या जामिनावर महिलेची मुक्तता करण्यात आली आहे.
(छायाचित्र- फाईल फोटो)