आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्ला खटल्याची पाकिस्तानात नौटंकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - 26-11 मुंबई हल्ला खटल्याची पाकिस्तानात अक्षरश: नौटंकी सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून विविध कारणे पुढे करून खटल्याची सुुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. शनिवारीही उलटतपासणीसाठी साक्षीदार गैरहजर राहिल्याने सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली.गेल्या अनेक महिन्यांपासून तांत्रिक मुद्दे व कायदेशीर पळवाटांचा आसरा मुंबई हल्ला खटल्याची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे हा खटला मुंगीच्या पावलाने पुढे सरकत आहे.

मुंबई हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयासमोर सुरू आहे. सुरक्षेच्या कारणावरून ही सुनावणी अदियाला तुरुंगात न्यायाधीश चौधरी हबीब उर रहेमान यांच्यासमोर सुरू आहे.शनिवारी सरकारी वकिलांचे साक्षीदार गैरहजर राहिल्याने रहेमान यांनी सुनावणी पुढे ढकलली. एका राजकीय कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे कराची शहरात तणावपूर्ण वातावरण होते. कराची ते रावळपिंडी विमाने रद्द करण्यात आल्यामुळे साक्षीदार गैरहजर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबई हल्ल्यात तीन पोलिस अधिकार्‍यांसह 166 बळी गेले होते. याप्रकरणी लष्कर ए तोयबाचा कमांडर झांगवीसह सात जणांविरोधात पाकिस्तानात खटला सुरू आहे.

फेडरलने पुरावे दिले
फेडरल तपास संस्थेने गेल्या वर्षीच्या सुनावणीत दहशतवादी प्रशिक्षण अड्डयांचे ढळढळीत पुरावे दिले होते.सिंध आणि खैबर पख्तुन या प्रांतात 10 अड्डे असल्याचे पुरावे त्यांनी दिले होते.अड्ड्यांमध्ये हाती लागलेले पुरावेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.

गुप्तचर अधिकार्‍यांची उलटतपासणी
शनिवारी फेडरल तपास संस्था आणि इतर गुप्तचर संस्थांच्या अधिकार्‍यांची बचाव पक्षाकडून उलटतपासणी करण्यात येणार होती. सन 2008 हल्ल्यातील दहशतवाद्यांना कसे पद्धतशीरपणे दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले त्याचे पुरावे या अधिकार्‍यांनी दिले होते.

01 महिन्यापासून हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली जात आहे.
22 डिसें. बचाव पक्षाची विनंती. न्यायाधीशांनी सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.

‘त्या’अधिकार्‍याच्या शरीरावर जखमा

इस्लामाबाद - नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) अधिकार्‍याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांच्या भ्रष्टाचाराचा तपास करणारा सहसंचालक कामरान फैसल याचा मृतदेह शुक्रवारी सरकारी विश्रामगृहात आढळून आला होता. त्याने आत्महत्या केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र फैसलच्या हात,मनगट, पाठीवर जखमा आढळल्याचे त्याच्या काकांनी सांगितले.