आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Attacks Case: Lakhvi's Detention Orders Suspended

भारताच्या दबावाखातर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवी पुन्हा अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी उर रहेमान लखवी याची तुरुंगातून होणारी सुटका पुन्हा एकदा थांबली. सहा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मोहम्मद अन्वरनामक एका व्यक्तीने सोमवारी गोलरा शरीफ पोलिस ठाण्यात लखवीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्यावर अपहरणाचा आरोप करून गुन्हाही नोंदवण्यात आला. यानंतर लगेच पोलिसांनी लखवीला ताब्यात घेऊन दंडाधिकार्‍यांसमोर हजर केले. दंडाधिकार्‍यांनी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मुंबई हल्ला प्रकरणात दहशतवादविरोधी न्यायालयाने लखवीला १८ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून त्याला पुन्हा अटक करण्याचा आदेश सरकारने दिला. या आदेशाला लखवीच्या वकिलांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. यावर हायकोर्टाने सोमवारी १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सरकारी आदेश रद्द करून त्याच्या सुटकेचा आदेश दिला. या आदेशामुळे आता लखवी मोकाट सुटणार असेच मानले जात होते. मात्र, भारताने याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला.

सोमवारी भारताच्या परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून घेत लखवीला जामीन मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याच वेळी इस्लामाबादेतील भारतीय वकिलातीनेही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे तीव्र आक्षेप नोंदवून नाराजी व्यक्त केली. यानंतर नाट्यमय घटनाक्रमात लखवीला पुन्हा अटक करण्याचे आदेश तुरुंग अधिकार्‍यांना देण्यात आले.

दोन दिवसांनंतर काय होईल?
अपहरणाच्या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने दोन दिवसांनी लखवीची कोठडी संपेल. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात सादर केले जाईल. पोलिसांनी कोठडीची मागणी केली नाही तर न्यायालय त्याला पुन्हा तुरुंगात पाठवू शकते.
- जामीनाच्या आदेशाची प्रत सरकारी वकिलांना मिळाली आहे. ते या निकालास हायकोर्टात आव्हान देणार आहेत. मात्र, हायकोर्टाला असलेल्या हिवाळ्याच्या सुट्या संपेपर्यंत म्हणजे ८ जानेवारीपर्यंत त्यांना वाट पहावी लागेल.

- कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरून लखवीला झालेल्या अटकेच्या प्रकरणात हायकोर्टाने १५ जानेवारीपर्यंत सरकारला म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्याची ही अटक योग्य की अयोग्य, हे
ठरेल.

भारताला खुश करण्यासाठी...
लखवीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी आरोप केला आहे की, भारताला खूश करण्यासाठी लखवीवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या बनावट एफआयआरला आव्हान देण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखवला. कोर्टाच्या आदेशांना आता सरकारी अधिकारी जुमानत नसल्याचेच यातून स्पष्ट होते, असा आरोपही रिझवान यांनी केला. एखाद्या तिसर्‍याच गुन्ह्यात आपल्या अशिलास अटक करणे म्हणजे कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे, असा दावा त्यांनी केला.