आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mushraff Hide In Military Headquartor Public Prosicutor Remark

मुशर्रफ हे पळपुटे असून ते लष्करी मुख्यालयात दडून बसले, सरकारी वकिलाचे मुक्ताफळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याबद्दल न्यायालयात सरकारी वकिलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. मुशर्रफ हे पळपुटे असून ते लष्करी मुख्यालयात दडून बसले आहेत, अशी मुक्ताफळे वकिलाने उधळल्याने मुशर्रफ यांच्या वकिलाने त्यावर जोरदार आक्षेप घेतला. त्यावरून कोर्टातच गदारोळाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.
मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे. सोमवारी त्यावरील सुनावणी सुरू असताना सरकारी वकील अक्रम शेख यांनी मुर्शरफ यांच्यावर हा आरोप केला. मुशर्रफ पळपुटे आहेत. न्यायालयाला टाळण्यासाठी जाणीपूर्वक ते लष्करी मुख्यालयात दडून बसले आहेत, असे शेख म्हणाले. त्यावर मुशर्रफ यांचे वकील अहमद रजा कसुरी यांनी तीव्र आक्षेप घेतला. सरकारी वकील सुनावणीमध्ये संपूर्ण लष्कराला ओढत आहेत. मुशर्रफ यांना सुनावणीला हजर न राहण्याची परवानगी नाकारावी, अशी सरकारी वकिलांची मागणी त्यानंतर न्यायालयाने फेटाळून लावली. परंतु मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुशर्रफ यांचा आरोग्यविषयक अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर परवानगीशिवाय देश सोडू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे.
डायनाच्या प्रियकराकडून मुशर्रफ यांच्यावर उपचार
मुशर्रफ यांच्यावर उपचार करत असलेल्या सात डॉक्टरांच्या पथकात हसनत अहमद खान यांचाही समावेश आहे. ब्रिटिश राजघराण्याची दिवंगत युवराज्ञी डायना हिच्यासोबतच्या संबंधामुळे डॉक्टर हसनत अहमद खान परिचित आहेत. रावळपिंडीतील लष्करी रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात खान कार्यरत आहेत. त्यांनी मुशर्रफ यांच्या हृदयविकारासंबंधी आपला वैद्यकीय सल्ला देणार आहेत. त्यांना उपचारासाठी परदेशात पाठवावे का, यावर त्यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. मुशर्रफ यांना 2 जानेवारीलाआपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी खान यांनी मलालास ब्रिटनमध्ये उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला दिला होता. तिच्यावर तालिबान दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता.
पहिल्यांदाच देशद्रोह : पाकिस्तानच्या इतिहासात देशद्रोहाचा खटला एखाद्या माजी लष्करप्रमुखावर चालवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यात मुशर्रफ दोषी ठरले तर त्यांना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.
परदेश दौ-यावर बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली
देशद्रोहाच्या प्रकरणात सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला. मुशर्रफ यांना देशाबाहेर जाण्यास रोखण्याची मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती शौकत अजीज यांनी फेटाळून लावली. परंतु कनिष्ठ न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता कामा नये, अशा शब्दांत न्यायालयाने चांगलेच ठणकावले.याचिका लाल मशिदीच्या शुहादा फाउंडेशनकडून दाखल करण्यात आली होती.
मुशर्रफांनी विकायला काढला लंडनमधील शाही बंगला
2009 मध्ये मुशर्रफ यांनी देश सोडून लंडनला मुक्काम हलवला होता. त्या वेळी त्यांनी 10 लाख पौंड्सला खरेदी केलेला बंगला विक्रीस काढण्यात आला आहे. त्याची अपेक्षित किंमत 30 लाख पौँड एवढी आहे. मायदेशी परतल्यानंतर या बंगल्याची दुरवस्था झाली होती. परंतु विक्रीला काढण्यापूर्वी बंगल्याची रंगरंगोटी आणि डागडुजी करण्यात आल्याने तो महागड्या किंमतीला विकण्यात येणार आहे. त्यात 70 वर्षीय मुशर्रफ यांना आर्थिक फायदा होणार आहे.