आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi Five Days Visit To America, Divya Marathi, Medison Square

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदीनॉमिक्स लवकरच जगाचा मंत्र होणार, अमेरिकेत भारतीय समुदायाची भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क सिटी - न्यूयॉर्क सिटीमध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुप्रतीक्षित सभेची जोरदार तयारी सुरू आहे. द इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाउंडेशन (आयसीएएफ) त्याचे आयोजक आहे. आतापर्यंत संघटनेने अमेरिकेत १८ हजारांच्या आसपास मोफत तिकिटे बुक केली आहेत. दैनिक "दिव्य मराठी'ने ग्राउंड झीरोवर या आयोजनासंबंधी काही प्रमुख लोकांशी चर्चा केली.

एव्हीजीचे सीईओ आणि संस्थापक शलभ कुमार भारतीय वंशाचे उद्योजक आहेत. त्यांच्यावर अमेरिकी संसदेतील प्रतिनिधींना सभेसाठी आणण्याची जबाबदारी आहे. त्याचबरोबर काही नवीन विधेयकांवरदेखील चर्चा घडवून आणली जाणार आहे. कुमार म्हणाले, नरेंद्र मोदी हे जगातील एक मोठे नेते, एक स्टेट्समन आणि भारताचे रोनाल्ड रेगन आहेत, असे मानून अमेरिकेने त्यांचे स्वागत केले पाहिजे.
जगात सध्या मजबूत आणि मोठ्या नेत्यांची उणीव आहे. पंतप्रधान मोदी त्याला भरून काढू शकतात. सध्या पीएमनी भारतासाठी गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ही गुंतवणूक अमेरिकेतील उद्योगपतींकडून मिळेल. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याकडून मिळणार नाही. ओबामा यांची भेट ही केवळ एक औपचारिकता असेल.

मोदींच्या आतापर्यंतच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नावर कुमार म्हणाले, त्यांनी चांगले काम केले आहे, असे मला वाटते. परंतु त्यात काही प्रमाणात वेग यायला हवा. बजेट बरे होते; परंतु क्रांतिकारी नव्हते. दिल्लीच्या प्रकरणात त्यांची पकड निर्माण होईल, तूर्त प्रतीक्षा करा. मोदीनॉमिक्स जगाचा नवा मंत्र बनेल. कार्यक्रमाचे बोलायचे झाल्यास सुरुवातीच्या अडचणींनंतर आयोजकांनी निधी उभारण्यासाठी चांगले काम केले. याचे स्वरूप आणखी मोठे हवे होते. पहिल्यांदा याचे गुजराती कार्यक्रम असे स्वरूप होते. अजूनही त्यात गुजरातींची संख्या अधिक आहे. त्यात पारदर्शकता हवी होती. शेवटी त्यावरून वाद उद्भवू शकतो. अमेरिकी फंक्शन आणि भारतीय फंक्शन यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. तिकिटे मोफत आहेत की विकले जात आहेत, हे कोणालाच निश्चित सांगता येत नाही. ही व्यवस्था पारदर्शक हवी होती.

ओबामांना कोणता सल्ला द्याल, असे विचारल्यावर कुमार म्हणाले, इमिग्रेशन विधेयकात भारताच्या विरोधातील एस ७४४ ची तरतूद वगळली पाहिजे. ती वगळण्यासाठी मोदींनी चर्चेतून प्रयत्न केले पाहिजेत. त्याचा परिणाम अमेरिकेत काम करणा-या सुमारे पाच लाख भारतीय आयटी प्रोफेशनल्सच्या आयुष्यावर होईल. त्याचबरोबर अमेरिकेत असलेल्या ५ हजार भारतीय- अमेरिकी कंपन्यांच्या मुळावर येणार आहे. भारताच्या जीडीपीला ३० अब्ज डॉलरचा वार्षिक फटका बसू शकतो. इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाउंडेशनचे सहसंस्थापक जीवन जुत्शी म्हणाले, मानवतेचे सर्वात शक्तिशाली सेवक (मोदी) यांना भेटण्यास उत्सुक आहे. फाउंडेशनविषयी ते म्हणाले, संस्था गेल्या २० वर्षांपासून अमेरिकेतील विविधतेला एकतेमध्ये गुंफण्याचे काम करत आहे. संस्थेच्या वतीने मोदी यांच्यासाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सुमारे ६०० लोक सहभागी होतील.