आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Prime Minister, India, BJP, Bhutan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या बळकटीमुळे शेजारी देशांतही समृद्धी, भूतानच्या संसदेत मोदींनी केले भाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिंफू - भारत आणि भूतानने सोमवारी आपल्या द्विपक्षीय संबंधांना बळकट करण्याचा निर्धार केला. भारत बळकट झाल्यास दक्षिण आशिया प्रदेशातील सहकार्य संघटना (सार्क) देखील मजबूत होईल. प्रदेशातील देशांत समृद्धी येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या संयुक्त संसदेत संबोधित करताना म्हटले आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर मोदी आपल्या पहिल्याच परदेश दौ-यावर रविवारी भूतानची राजधानी थिंफूमध्ये दाखल झाले होते. त्यांनी भूतानचे राजे व पंतप्रधान यांच्याशी वेगवेगळी भेट घेऊन चर्चा केली. सोमवारी त्यांनी भूतान संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला हिंदीतून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारत जेवढा अधिक बळकट होईल तेवढा प्रदेशातील देशांना त्याचा फायदा होईल. भारतात सत्तांतर झाले असले तरी दरवाजे बंद होणार नाहीत आणि आम्ही मनाचे दरवाजे बंद केलेले नाहीत, असेही मोदींनी स्पष्ट केले. दरम्यान, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोग्बे यांनी सोमवारी ट्विट करताना मोदी यांचा दौरा यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे.

परंपरेला छेद देऊन मोदींसाठी टाळ्यांचा कडकडाट
भूतानमध्ये टाळी वाजवण्याची परंपरा नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यानंतर मात्र सोमवारी संसदेतील लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केल्याचे पाहायला मिळाले. टाळी वाजवणे हे भूतानमध्ये अत्यंत अयोग्य मानले जाते, परंतु मोदींच्या भाषणाने त्यांना प्रेरणा मिळाली. मोदी यांनी 45 मिनिटांचे भाषण कागदाच्या मदतीविना ओघवत्या शैलीतून केले. हिंदीतून झालेल्या भाषणाने संसदेतील लोकप्रतिनिधींची मने जिंकली. उत्स्फूर्त टाळ्या हे त्याचेच द्योतक होते.

करार असे
०दोन्ही देश आपल्या जमिनीचा वापर परस्परांच्या विरोधात करू देणार नाहीत
०भारतातून दूध पावडर, गहू, खाद्यतेल, डाळी आणि तांदूळ निर्यातीसंबंधीचे निर्बंध भूतानसाठी राहणार नाहीत.
०नेहरू-वांगचूक शिष्यवृत्तीला दुप्पट करणार. त्यावर दोन कोटी रुपये खर्च. ०भूतानच्या सर्व 20 जिल्ह्यांत ई-लायब्ररी करण्यासाठी भारताचे अनुदान.
०जलविद्युत क्षेत्रात उभय देशांचे परस्परांना सहकार्य.
०भूतानमध्ये 10 हजार मेगावॉट वीज उत्पादनाचे लक्ष्य

दहशतवाद तोडणारे, पर्यटन जोडणारे
दहशतवाद तोडणारा आहे, तर पर्यटन क्षेत्र नागरिकांना परस्परांना जोडणारे असते. त्यामुळे गरिबातील गरीब व्यक्तीला रोजगाराची संधी मिळेल. भूतान आणि भारत संबंध दूध-पाण्यासारखे आहेत. ते एकमेकांपासून कोणत्याही स्थितीत वेगवेगळे करता येत नाही. हे संबंध केवळ राजकीय स्वरूपाचे नसून त्याला सांस्कृतिक वारसादेखील आहे, असे मोदी म्हणाले.

भूतानसोबतच्या संबंधावर चीन समाधानी
भारत-भूतान यांच्यातील संबंध बळकट होत असल्याचे पाहून आम्हाला निश्चितपणे आनंद वाटतोय. त्यांच्याशी आम्ही राजकीय संबंध प्रस्थापित करू शकलो नाहीत, परंतु आमच्या दोन शेजारी देशांच्या संबंधात बळकटी येत असल्याचे पाहून आनंद वाटला, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुवा चुनयिंग यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भूतानकडे भारताचे दुर्लक्ष होत असलेले पाहून चीनने भूतानमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण ते निष्फळ ठरले.