आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटो मार्ग पुन्हा खुला : पाक-अमेरिकेचे सूत जुळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- पाकिस्तानने नाटोचा मार्ग खुला केल्याने दोन्ही देशांतील संबंधात असलेले अडथळे दूर झाले असून त्यात सुधारणा होत आहेत, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानला आर्थिक मदत देण्यासाठी येथे आयोजित परिषदेनंतर त्यांनी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांची भेट घेतली. या बैठकीत उभय देशांतील संबंधांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांतील संबंध ताणले गेल्यामुळे दक्षिण आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात हिलरी यांनी नोव्हेंबरातील हवाई कारवाईबद्दल पाकिस्तानची फोनवरून माफी मागितली होती. त्यानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये नाटोच्या हवाई कारवाईत 24 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दोन्ही देशांचे बिनसले होते. त्या घटनेच्या आठ महिन्यानंतर पाकने नाटोचा मार्ग खुला केला. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी आमच्यासमोर काही आव्हाने आहेत. ती दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे हिलरी म्हणाल्या. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या. या बैठकीत दहशतवादाचे उच्चाटन करण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, नाटो मार्गावरून पाकवर निर्बंध टाकण्यापर्यंतचा विचार अमेरिकेकडून केला जात होता.
सरियन सरकार कोसळणार - शांततेचे सर्व प्रयत्न संपले आहेत. मर्यादाही संपली आहे. आता सिरियन सरकार कोसळू शकते, असा इशारा हिलरी यांनी दिला. त्या टोकियोमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. सोळा महिन्यांपासून सिरियात हिंसाचार सुरूच आहे. दुसरीकडे विरोधकदेखील अधिक आक्रमक होऊन सरकारला पाडू शकतात. त्यामुळे बशर अल असाद यांनी वेळीच निर्णय घेऊन सत्ता सोडावी. त्यातच देशाचे आणि प्रदेशाचे भले आहे, असे हिलरी म्हणाल्या.