आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाज शरीफांनी भारताला टाळले; काश्मीर मुद्द्याला बगल, चीनचे केले कौतुक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये शेर-ए-पंजाब नावाने प्रसिद्ध असलेले नवाझ शरीफ यांनी बुधवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तिसर्‍यांदा पंतप्रधान होणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत. नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांना राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी) आणि इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने आव्हान दिले होते. एकूण 342 पैकी शरीफांना 244 मते मिळाली. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाची 180 मते होती. त्यांचा विजय जवळपास निश्चितच होता.

शपथ घेतल्यानंतर दिलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी भारताबरोबरचे संबंध किंवा काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला नाही. अमेरिकेकडून पाकिस्तानात होत असलेल्या ड्रोन हल्ल्याबाबत ते म्हणाले की, अमेरिकेला हे हल्ले थांबवावेच लागतील. मात्र, त्यांनी तालिबान किंवा दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम जाहीर केला नाही. विशेष म्हणजे शरीफ यांनी तालिबानशी शांतता बोलणी करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु ड्रोन हल्ल्यामध्ये तालिबानचा क्रमांक दोनचा नेता वली उर रेहमान मारला गेल्यानंतर त्यांनी चर्चेस नकार दिला आहे.

पहिल्या भाषणात शरीफ म्हणाले...
>आम्ही आव्हानांचा सामना करायला तयार आहोत. मी काहीही लपवणार नाही किंवा खोटी आश्वासने देणार नाही. आम्ही कोणताही पक्षपात करणार नाही. भ्रष्ट लोकांना शिक्षा केली जाईल.
>दुसर्‍यांची (अमेरिका) आमच्याबाबतची काळजी समजून घेतली पाहिजे. आपली चिंताही त्यांना सांगू आणि समस्येवर तोडगा काढावा लागेल. हे ड्रोन हल्ले दररोजच सुरू आहेत. आता ते बंद झालेच पाहिजेत.

सरकारसमोरील आव्हाने
> पाकिस्तानमधील तालिबानचे वाढते हल्ले
> अफगाणिस्तानातून अमेरिकी लष्कराने माघार घेतल्यानंतर पाकिस्तानला कोणताही धोका पोहोचू न देणे

अमेरिकी ड्रोन हल्ले थांबणे
>भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे जाळे मोडीत काढणे
>बिघडलेली अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणणे
>बेरोजगारी संपुष्टात आणण्याच्या उपाययोजना आखणे
>विरोधकांत असताना कर सुधारणेला विरोध केला, पण आता त्याची अंमलबजावणी करणे
>व्होट बँक असलेल्या श्रीमंत आणि सराईत कर चोरांकडून करवसुली करणे
>विजेच्या संकटातून देशाची सुटका करणे