आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ म्हणाले, भारतासोबतचे संबंध थांबले तेथून सुरू करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतर दुसर्‍यादिवशी नवाझ शरीफ यांनी भारतासोबतच्या संबंधाचा उल्लेख केला. भारतासोबतचे सबंध सुधारण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. काश्मीरसह सर्व मुद्दे शांततापूर्ण पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
शरीफ यांनी सरकारच्या विदेश धोरणाची रूपरेषा जाहीर करताना वरील मतप्रदर्शन केले. सर्व देशातील पाकिस्तानी अधिकाºयांना संदेश देताना ते म्हणाले, शेजारी देशांना प्राधान्य देण्यास आमचे प्राधान्य राहील. आपल्या प्रदेशात शांतता नांदणार नाही तोपर्यंत विकास आणि आर्थिक वृद्धीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. त्याआधी 1999 मध्ये सत्ताच्यूत होण्याच्या स्थितीपर्यंत आपण भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते, असा उल्लेख त्यांनी केला होता. ते म्हणाले, संबंधाचा धागा जेथे तुटला तेथून पुढे वाटचाल सुरू राहील. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी शांतता प्रक्रियेला सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून वाजपेयी लाहोरपर्यंत शांतता बसने गेले होते. अमेरिकेबाबत ते म्हणाले, अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचे समान हित आहे. त्यांनी मध्यपूर्व देशांसोबतचे संबंध सुधारण्याचा पुरस्कार केला. अरब, तुर्की आणि इराण मित्र देश आहेत. चीन सदैव पक्का मित्र आणि आर्थिक सहकारी राहील.


पंतप्रधान सचिवालयाचे नामकरण
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान सचिवालयाचे नाव बदलले. नवे नाव पंतप्रधान कार्यालय असेल. पंजाबचे नोकरशहा नासीर मुहंमद खोसा यांची पंतप्रधानांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फवाद हसन फवाद अतिरिक्त सचिव असतील.

उमरासाठी सौदी अरेबियाला रवाना
नवाझ शरीफ गुरुवारी उमरासाठी सौदी अरेबियाला रवाना झाले. तेथे ते राजे अब्दुल्ला व अन्य सौदी अधिकाºयांशी बातचीत करतील.

सहा मंत्र्यांना खातेवाटप

नवाझ शरीफ यांनी सहा मंत्र्यांचे खातेवाटप केले आहे. सिनेटर इशाक डार यांना वित्त, चौधरी निसार अली खान - गृह, शाहिद खाकन अब्बासी - तेल, परवेझ रशीद- माहिती प्रसारण, ख्वाजा आसिफ - ऊर्जा तसेच तारिक फातमी यांना परराष्ट्र मंत्रालय देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.