आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Sharif's PML N Has Emerged The Single Largest Party

पाकिस्तानात पीएमएलची मंत्रिमंडळासाठी जद्दोजहेद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - नवाज शरीफ यांच्या नव्या मंत्रिमंडळात अत्यंत महत्वाच्या परराष्ट्रमंत्रीपदासाठी पक्षाचे जेष्ठ नेते अहसान इक्बाल आणि ख्वाजा असिफ यांची नावे आघाडीवर आहेत.तर इशाक दर यांचे नाव अर्थमंत्रीपदासाठी घेतले जात आहे.

54 वर्षीय अहसान इक्बाल हे प्रतिष्ठीत व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसचे पदवीधर आहेत.त्याचबरोबर पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज (पीएमएल-एन) पक्षाचे प्रवक्तेही आहेत. तर 63 वर्षीय असिफ हे माजी बँकर आहेत. दोघेही पंजाब प्रांतातील असून दोघेही शरीफ यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आहेत. शरीफ यांनी भारतासोबतचे राजनैतिक व आर्थिक संबंध सुधारण्याचे संकेत दिल्यामुळे परराष्ट्रमंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी कुणाला मिळणार याकडे उभय देशातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

वरिष्ठ सभागृह सिनेटचे सदस्य इशाक दर यांची अर्थमंत्रीपदी वर्णी लागू शकते. गिलानींच्या मंत्रिमंडळातही ते अर्थमंत्री होते.दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी दर यांची निवड केली जाऊ शकते.परंतु परराष्ट्रमंत्रीपदासाठी त्यांचाही विचार केला जाऊ शकतो.दरम्यान, शरीफ यांच्या नेतृत्वाखाली भारतासोबतचे संबंध दृढ होतील असे अमेरिका आणि चीनने म्हटले आहे.

जून महिन्यात अर्थसंकल्प
जून महिन्यात पाकिस्तानचा नवा अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे.अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बेलआऊट पॅकेज घेण्याची कठीण जबाबदारी नव्या अर्थमंंत्र्यांना पार पाडावी लागणार आहे. वाढती महागाई,चलनफुगवटा, उद्योग क्षेत्राला संजीवनी तसेच रोजगार निर्मीती हे आव्हान अर्थमंत्र्यासमोर आहे. मतमोजणी संथगतीने
शनिवारी रात्रीच सुरु झालेली मतमोजणी अद्यापही संपलेली नाही. 272 पैकी केवळ 250 जागांचे निकाल हाती आले असून शरीफ यांच्या पक्षाने 122 जागा जिंकल्या आहेत. तर तेहरिक ए इन्साफ आणि पीपीपी खूपच पिछाडीवर पडले आहेत.त्यांना अनुक्रमे 31 व 26 जागा मिळाल्या आहेत. एमक्यूएमला 16,जमियत उलेमा ए इस्लामने 10 तर अपक्षानी 25 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान 49 मतदान केंद्रांवर 100 टक्के मतदान झाले आहे.

खैबरवर इम्रानची सत्ता
तालिबान्यांच्या खैबर-पख्तुनख्वाँ प्रांतात (वायव्य सरहद्द प्रांत) इम्रानखानच्या तेहरिक पक्षाने 99 पैकी 35 जागा जिंकल्या आहेत.जमात ए इस्लामी (7)च्या पाठिंब्यावर तेहरीकची सत्ता येणार आहे. तर सिंधमध्ये 130 पैकी 62 जागा मिळवून पीपीपीने निर्वीवाद बहुमत मिळवले आहे.सिंधमध्ये पीपीपीचा गड शाबूत राहिला.

दोन राज्यात सत्ता
पाकिस्तानातील चारपैकी दोन प्रांतांमध्ये शरीफ यांचा पक्ष सत्तेवर येणार आहे. बलुचिस्तान आणि पंजाबमध्ये पीएमएल-एन सत्तेवर येणार आहे.बुलचिस्तानमध्ये पीएमएल आणि पीएमएपी यांनी 51 पैकी प्रत्येकी 9 जागा मिळवल्या आहेत.तर नॅशनल पार्टीने 6 जागा जिंकल्या आहेत. या तिन्ही पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे.तर पंजाबमध्ये 297 पैकी 212 जागांसह पीएमएलने बहुमत मिळवले आहे.

कराची शेअर बाजार उसळला
पाकिस्तानात स्थिर सरकार व अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची आशा असल्याने कराची शेअर बाजारात तेजी आली आहे. केएसई-100 या निर्देशांकांने 20 हजारांचा पल्ला सोमवारी प्रथमच पार केला.त्यानंतर मंगळवारीही बाजार 229 अंकांनी उसळला.दिवसअखेर निर्देशांक 20474.62 अंकावर स्थिरावला.

भारताच्या तुलनेत लहान जीव
भारतीय शेअर बाजाराच्या तुलनेत पाकिस्तानच्या के एसई-100 चा जीव अत्यंत लहान आहे. या बाजारात केवळ 569 कंपन्यांची नोंदणी आहे. व बाजार भांडवल सुमारे 5 लाख कोटी रुपये आहे. भारतीय शेअर बाजारात पाच हजारावर कंपन्यांची नोंद असून एकूण बाजार भांडवल 70 लाख कोटी रुपये आहे.
संभाव्य मंत्रिमंडळ
नवाज शरीफ : पंतप्रधान
परराष्ट्रमंत्री - अहसान इक्बाल, ख्वाजा असिफ
इशाक दर : अर्थमंत्री
अब्दुल कादीर बलुच : गृहमंत्री
परवेज रशिद, मुशिदुल्लाह खान, ख्वाजा साद रफिक : माहिती व प्रसारण मंत्री

खुर्रम दस्तगीर खान : वाणिज्य राजदूताचा राजीनामा
शेरी रेहमान यांनी पाकि स्तानच्या अमेरिके तील राजदूतपदाचा राजीनामा दिला आहे.सार्वत्रिक निवडणूकीत पीपीपीचा सफाया झाल्यामुळे रेहमान यांनी राजीनामा दिला.