आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Attack On Syria, Raussian Diplomacy Successeded

सिरियाविरुद्धची लढाई टळणार, रशियाने अमेरिकेशी केलेल्या शिष्‍टाईस यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस/मॉस्को,/वॉशिंग्टन - सिरियाविरुद्धची लढाई टळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अमेरिकेचा हल्ला टाळण्यासाठी रशियाने केलेली शिष्टाई फळास आली आहे. आपली रासायनिक अस्त्रे निरीक्षण आणि नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सोपवण्याची सिरियाने तयारी दश्रवली आहे, तर सिरियाने रासायनिक अस्त्रांच्या साठा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सोपवण्याची तयारी दखवल्यास अमेरिका हल्ला करणार नाही, असा शब्द राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही दिला आहे.


रासायनिक अस्त्रांबाबत नेमकी आणि ठोस योजना तयार करीत असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. रशियाचा प्रस्ताव मान्य असल्याचे सिरियाचे परराष्ट्रमंत्री वालिद अल मुवल्लेम यांनी सांगितले. अमेरिकेच्या हल्ल्यातील हवा काढून घेण्यासाठी हा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे मुवल्लेम यांनी सांगितले. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी रशियाचे सर्गेई लाव्हारोव यांची भेट घेतली होती. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून म्हणाले, सिरियाची तयारी असल्यास आम्ही रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी सुरक्षा परिषदेलाही सांगू.


एकाच वेळी सहा वाहिन्यांना मुलाखत
लष्करी कारवाईचे विधेयक अमेरिकी काँग्रेसमध्ये असताना जनतेचा व संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ओबामांनी सोमवारी एकाच वेळी सहा वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. त्या वेळी लढाई टाळण्यासाठी रशियाच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी रासायनिक अस्त्रांवरील हक्क सोडल्यास
हल्ल्याची योजनाही बासनात गुंडाळून ठेवू, अशी हमी त्यांनी दिली.


मतदान पुढे ढकलले
लष्करी कारवाईसाठी सिनेटकडून मंजुरीचा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता मावळली आहे. रिपब्लिकन आणि ओबामांच्या डेमोक्रॅटिक पक्षातून हल्ल्यासाठी विरोध होत असून सिनेटमध्ये विधेयक संमत होणार नाही, असे दिसताच सिनेटचे नेते हॅरी रिड यांनी विधेयकावरील मतदान पुढे ढकलले आहे.


भारताकडून स्वागत : सिरियाच्या पुढाकाराचे भारताने स्वागत केले आहे. सिरियातील रासायनिक अस्त्रे नष्ट केली पाहिजेत, असे भारताने वारंवार म्हटले आहे. अगर बोलणी होत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.


बंडखोरांचा इशारा : सिरियन राष्ट्रीय आघाडीने रशियाच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. हा समस्येला टाळण्याचा प्रयत्न असून त्यामुळे सिरियात हिंसाचार उफाळेल, आणखी निरपराध नागरिकांचे बळी जातील, असा इशारा आघाडीने दिला आहे.


50 मते विधेयकासाठी ओबामांना सिनेटमध्ये कमी पडू शकतात, असे सध्याचे चित्र आहे.