छायाचित्र: किफे आणि मे-ब्रिट मोझर आणि एडवर्ड मोझर दाम्पत्य
स्टॉकहोम - मानवी शरीरातील जीपीएस यंत्रणेचा शोध लावणारे अमेरिकेचे जॉन ओ किफे आणि नॉर्वेचे मे-ब्रिट मोझर आणि एडवर्ड मोझर यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी जगातील २६३ वैज्ञानिकांना नामांकन मिळाले होते.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र आणि शांततेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा १३ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने होणार आहे. आल्फ्रेड नोबेल यांची १० डिसेंबरला पुण्यतिथी असून त्या दिवशी पुरस्कार प्रदान सोहळा होईल. वैज्ञानिकांना ६७७ कोटी रुपयांची पुरस्कार रक्कम प्रदान केली जाईल.
आठवण ठेवणाऱ्या कोशिकेचा लावला शोध
किफे आणि मोझर दांपत्याने उंदरांवर संशोधन केले.
आपण कुठे आहोत हे सांगणाऱ्या कोशिकेचा शोध त्यांनी लावला. आपण रस्ते कसे लक्षात ठेवतो, पुढच्या वेळी त्या जागी जाण्यासाठी तत्काळ योग्य रस्ता मिळण्याची आठवण कशी होते याची माहिती या संशोधनाद्वारे मिळाली.
1971 मध्ये किफेंनी लावला होता नर्व्ह सेलचा शोध
जेव्हा एखाद्या उंदराला खोलीतील एखाद्या विशिष्ट जागी ठेवले जात होते त्यावेळी त्यांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागातील मज्जातंतू पेशी सक्रिय होतात. मेंदूत पसरलेल्या पेशींचे जाळे खोलीचा नकाशा मेंदूत तयार करते, असे किफे यांना १९७१ मधील संशोधनात आढळले होते.
मोझर दांपत्याचे नवे संशोधन
मोझर दांपत्याने ३४ वर्षांनंतर म्हणजे २००५ मध्ये मेंदूतील पोझिशनिंग सिस्टिममधील आवश्यक तत्त्व शोधले. त्यांनी दुसऱ्या प्रकारच्या मज्जातंतू पेशी शोधून काढल्या आणि त्यांना ग्रिड सेल असे नाव दिले. ग्रिड सेल समन्वय यंत्रणा तयार करतात. रस्ता शोधण्यासाठी त्या मदत करतात.
नोबेल पटकावणारे मोझर दांपत्य पाचवे | आधी यांना मिळाला होता पुरस्कार- * मेरी क्युरी-पेरी क्युरी * इरिन जोलियो क्युरी- फ्रेडरिक क्युरी * गर्टी कोरी- कार्ल कोरी * अल्वा मिरदाल-गुन्नर मिरदाल