Home »International »Other Country» North Korea Nuclear Test - Political Turmoil Around The World

उत्तर कोरियाची अणुचाचणी - जगभरात राजकीय हादरे

वृत्तसंस्था | Feb 13, 2013, 07:08 AM IST

  • उत्तर कोरियाची अणुचाचणी -   जगभरात राजकीय हादरे

प्योंगयांग/ वॉशिंग्टन - संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेसह जगभरातील बलाढ्य देशांचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने मंगळवारी तिसरी अणुचाचणी केली. या अणुचाचणीमुळे उत्तर कोरियाचे सर्वात जवळचे मित्रराष्ट्र चीनही चकित झाले आहे. ही अणुचाचणी म्हणजे जागतिक सुरक्षेला धोका असल्याचे सांगत सर्वच देशांनी निषेध नोंदवला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी हे चिथावणीखोर पाऊल असल्याचे सांगत उत्तर कोरियाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. उत्तर कोरियाचे हे पाऊल ओबामा प्रशासनाला खुले आव्हान मानण्यात येत आहे. ओबामा हे आपल्या दुस-या कार्यकाळाच्या सुरुवातीचे स्टेट ऑफ द युनियन भाषण देणार होते, तीच वेळ उत्तर कोरियाने अणुचाचणीसाठी निवडली, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनंतर जगभरात उठलेल्या तर्कवितर्कांना उत्तर कोरियानेच पूर्णविराम दिला. भूमिगत स्फोट करून तिसरी यशस्वी अणुचाचणी घेण्यात आल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले. एका छोट्याशा उपकरणाच्या साह्याने हे यश मिळवण्यात आल्याचा दावाही या राष्ट्राकडून करण्यात आला. क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे तैनात करण्याचे हे महत्वाचे पाऊल आहे.

अशी लागली खबर
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सेवेने मंगळवारी पहाटे 4.9 तीव्रतेच्या कृत्रिम भूकंपाच्या झटक्यांची नोंद केली. या भूकंपाचे केंद्र प्योंगयांगच्या ईशान्येला 379 किलोमीटर अंतरावर होते. उत्तर कोरियाने 2006 आणि 2009 मध्ये अणुचाचणी घेतलेली दोन ठिकाणे किंवा त्यांच्या जवळपास अणुचाचणी घेतली, असे दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेचे म्हणणे होते. त्यांच्याकडे भूकंपाची तीव्रता 4.7 आणि 5.5 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. 2006 आणि 2009 मध्ये अणुचाचणीच्या धक्क्यांची तीव्रता 3.9 आणि 4.5 होती.

पूर्वीपेक्षाही शक्तिशाली
उत्तर कोरियाची ही अणुचाचणी आधीच्या दोन अणुचाचण्यांपेक्षाही शक्तिशाली होती, असा संशय दक्षिण कोरियाने घेतला आहे; परंतु हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या 20 किलो टन अणुबॉम्बच्या तुलनेत ही चाचणी छोटी होती. या अणुचाचणीत हलक्या अणुतंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे स्फोटक क्षमता जास्त असूनही आजूबाजूच्या पर्यावरणावर या चाचणीचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असे केसीएनए या उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.जागतिक समुदायाला दिलेला शब्द मोडून उत्तर कोरियाने घेतलेल्या अणुचाचणीमुळे प्रदेशाची शांतता आणि स्थैर्यावर विपरीत परिणाम होणार आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन
हे संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाचे उघड उल्लंघन आणि चिथावणी देणारी कारवाई आहे.
बान की मून, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र
ही अत्यंत चिथावणीखोर कारवाई आहे. जगाने त्याविरुद्ध तत्काळ कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
बराक ओबामा, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
हा आमच्या देशासाठी गंभीर धोका आहे. ते कदापि सहन केले जाऊ शकत नाही. जागतिक समुदायाची सुरक्षा आणि शांततेला त्याने मोठे नुकसान पोहोचणार आहे.
शिंजो आबे, जपानचे पंतप्रधान
हा कोरियन बेटांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठा अस्वीकारार्ह धोका आहे.
चून यंग वू, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचे राष्ट्रीय सल्लागार


असे आहे संकट
उत्तर कोरियाच्या या अणुचाचणीमुळे ओबामा प्रशासनाच्या दुस-या कार्यकाळाच्या प्रारंभीच संरक्षण आणि कूटनीतीविषयक आव्हान उभे केले आहे. शेजारी चीन, जपान आणि दक्षिण कोरियापुढेही मोठे आव्हान उभे केले आहे. या देशांमध्ये एक तर नवीन नेतृत्व सत्तेवर आले आहे किंवा आगामी काळात येणार आहे.

Next Article

Recommended