आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता सायबर युध्‍दासाठी 95 नियमावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भविष्यकाळात ऑनलाइन हल्ल्यांमुळे युद्धाचा भडका उडण्याचा धोका लक्षात घेऊन सायबर युद्धाची पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय नियमावली तयार करण्यात आली आहे. 95 नियमांचा अंतर्भाव असलेली ही नियमावली गेल्या आठवड्यात अस्तित्वात आली.

नाटोच्या सायबर डिफेन्स सेंटरने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ही नियमावली तयार केली आहे. सायबर हल्ल्यामुळे गंभीर दुखापत, अपरिमित वित्तहानी अथवा मानवाच्या मृत्यूचाही धोका उद्भवू शकतो, अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इलेक्ट्रिक ग्रीडवर ऑनलाइन हल्ला केल्यास शॉट सर्किट अथवा आग लागून माणसाचा मृत्यू ओढवू शकतो, असे त्यात म्हटले आहे. हल्ल्याच्या नियमावलीचे एक पुस्तक 20 कायदेतज्ज्ञांनी तयार केले आहे. यामध्ये निवृत्त ब्रिटिश एअर कमोडोर त्याचप्रमाणे आघाडीच्या अनेक ब्रिटिश विधी तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच भारत, अमेरिका, दक्षिण कोरियाच्या सरकारी वेबसाइट्स, आघाडीच्या कंपन्यांच्या संगणकीय सिस्टिम्सवर चिनी लष्कराच्या हॅकर्सनी सायबर हल्ले केले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सायबर युद्ध नियमावली तयार करण्यात आली आहे.

आण्विक प्रकल्पांवर बंदी
रुग्णालये, आण्विक प्रकल्प, धरणे, बंधारे, नागरी वस्त्या यावर सायबर हल्ले टाळण्याचा महत्त्वपूर्ण नियमही यात करण्यात आला आहे. विशेषत: अणुऊर्जा प्रकल्प, धरणे आणि बंधा-यांच्या सिस्टिम्सवर हल्ला केल्यास जबर प्राणहानी आणि वित्तहानी होऊ शकते. अगदी लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे असले तरीही या ठिकाणांवर हल्ले क रू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.

नाटोचे निमंत्रण
इस्टोनियातील नाटोच्या सायबर डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स संस्थेने ही नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. सायबर हल्ल्यामुळे प्राणहानी अथवा वित्तहानी झाल्यास प्रतिकार करण्यासाठी पारंपरिक लष्करी युद्ध करण्याची तरतूदही या नियमावलीत समाविष्ट करण्यात आली आहे.

हॅक्टिव्हिस्ट :सायबर हल्ला करणा-या हॅकर्सना हॅक्टिव्हिस्ट असे नाव देण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या ते सामान्य नागरिक असले तरीही सायबर युद्धात हे लोक टार्गेट ठरू शकतात.

2008 मध्ये नाटोची को-ऑपरेटिव्ह सायबर डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ही संस्था स्थापन करण्यात आली होती. रशियामधून इस्टोनियावर सायबर हल्ले झाल्यानंतर ही संस्था स्थापन करण्यात आली होती.
रुग्णालयांवर प्रतिबंध: पारंपरिक युद्धामध्येही रुग्णालये, वैद्यकीय संस्थांवर हल्ले करण्यात येऊ नये, असा नियमच आहे.

अधिकृत नियमावली नाही : सायबर हल्ल्याच्या नियमांची ही पुस्तिका म्हणजे नाटोचा अधिकृत नियमावली अथवा दस्तऐवज नसून मार्गदर्शक नियमावली म्हणून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केली आहे.