आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - बलुचिस्तान प्रांतातील दुर्गम भागात झालेल्या महाभयंकर भूकंपानंतर मदत पोहोचवणेही जिकिरीचे झाले आहे. या भागातील हजारो घरे मातीची असल्याने अनेक जण आपल्याच घराखाली मातीत गाडले गेले. भूकंपातील मृतांची संख्या 350 वर गेली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानी सेना बलुचिस्तान प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये मदतीसाठी धावली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू अवारन जिल्ह्यात असून या जिल्ह्यात सर्वाधिक बळी गेले आहेत. भूकंपाची तीव्रता 7.7 होती असे बलुचिस्तानचे गृहसचिव असाद गिलानी यांनी सांगितले. भूकंपाचे धक्के बसलेला हा भाग अत्यंत दुर्गम असून तिथे पोहोचण्यासाठी रस्तेही धड नाहीत. त्यामुळे मदत पोहोचवणेही अवघड जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 3 लाख लोकांना मंगळवारच्या भूकंपाचा तडाखा बसला आहे असून मातीची घरे कोसळल्याने हे लोक उघड्यावर आले आहेत. शेकडो लोक मातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावलेल्या हजारो भूकंपग्रस्तांना अन्नपाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे.अवारन व जवळपासच्या सहा जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा बसला आहे.अवारन गाव तर पुरते उद्धवस्त झाले आहे. घरेदारे, रुग्णालय, शाळा, सरकारी कार्यालये भुईसपाट झाली असून केवळ मातीचे ढिगारे उरले असल्याचे अवारानच्या रहिवाशांनी सांगितले.
सौम्य धक्के सुरूच
मंगळवारी बलुचिस्तानसह कराची, लाहोर आणि नवी दिल्लीतील काही भागातही भूकंपाचे हादरे जाणवले होते. भूकंपानंतरचे सौम्य धक्केही सुरूच आहेत.पाकिस्तानात बुधवारी पुन्हा धक्के बसले त्याची तीव्रता 4.7 नोंदली गेली.
उलटसुलट आकडे
क्वेट्टा येथे पाकिस्तानी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मेजर जनरल मुहंमद सईद अलीम यांनी दिलेल्या माहितीनुसार 271 ठार तर 246 जखमी झाले आहेत. तर अवारन व केछ भागातील सरकारी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार 327 मृतदेह हाती लागले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.