आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Dautor Malia, Malala Most Effective Child Girl, Time Magzine List Declared

ओबामा कन्या मालिया, मलाला सर्वात प्रभावी किशोरवयीन मुली,‘टाइम’ मॅगेझिनची यादी प्रसिद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया व पाकिस्तानची अल्पवयीन सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझाई यांची गणना सर्वात प्रभावशाली किशोरवयीन मुलींमध्ये करण्यात आली आहे.
टाइम मॅगेझिनने 2013 ची प्रभावशाली किशोरवयीन मुला-मुलींची यादी प्रसिद्ध केली. यात शिक्षण, संगीत, क्रीडा, लेखन या सर्वच क्षेत्रांत लहान वयात चमकदार कामगिरी करणा-या मुला-मुलींची दखल घेतली आहे. बराक ओबामा यांच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या दुस-या शपथविधी समारंभादरम्यान ओबामा कन्या मालिया व तिची लहान बहीण साशा यांचा सोहळ्यातील वावर अत्यंत संयमी होता. सेलिब्रिटीच्या मुली असतानादेखील मुलींनी सामान्य जगावे यासाठी मिशेल ओबामा यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख ‘टाइम’ने केला आहे. ओबामा आपल्या भाषणामध्ये मुलींचा उल्लेख अनेकदा करतात. मलाला युसूफझाईने पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यामुळे तालिबानने तिच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यातून ती बचावली आहे. तिला नोबेलच्या शांतता पुरस्कारासाठी नामांकन, साखरोव्ह पुरस्कार, क्लिंटन ग्लोबल सिटिझन अवॉर्ड मिळाला आहे.
ओबामा यांच्यासोबतची चर्चा, ब्रिटनच्या महाराणीची भेट तसेच संयुक्त राष्‍ट्रात केलेल्या भाषणामुळे मलालाचे स्वप्न, धैर्य व दृष्टिकोन समजला. हल्ल्यानंतरही मलाला खचली नाही, त्याउलट तिने आपली भूमिका जोर देऊन मांडल्याचे ‘टाइम’ने म्हटले आहे. गेल्या महिन्यात तिने ओबामा, मिशेल तसेच मालिया व साशाची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली होती.
प्रभावशाली किशोरवयीन मुला-मुलींच्या यादीत न्यूझीलंडच्या 16 वर्षीय गोल्फर लॅडिया कोचा समावेश आहे. तिने लहान वयात लेडीज प्रोफेशनल्स गोल्स असोसिएशनची (एलपीजीए) स्पर्धा जिंकली. लंडन ऑलिम्पिक 2012 स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारी 18 वर्षीय जलतरणपटू मिसी फ्रँकलिनला या यादीत स्थान देण्यात आले आहे.