वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शांततेसाठी आव्हान करताना भारताचा दाखला देत येथील कमी होत असलेल्या धार्मिक सहिष्णुतेचा उल्लेख केला. आज जर महात्मा गांधी असते तर त्यांनादेखिल अशाप्रकारची असहिष्णुता पाहून धक्का बसला असता, असा शब्दांत बराक ओबामांनी भारतातील धार्मिक तणावाबाबत वक्तव्य केले आहे.
हाय-प्रोफाइल "नेशनल प्रेयर ब्रेकफास्ट' दरम्यान बोलताना ओबामांनी यासंदर्भात वक्तव्य केले. ओबामा म्हणाले की, मिशेल आणि मी नुकतेच भारताचा दौरा करून परतलो आहोत. भारत अत्यंत सुंदर, भव्य, विविघतांनी नटलेला असा अतुलनीय देश आहे. पण गेल्या काही वर्षांत याठिकाणी अनेकवेळा एका धर्माच्या लोकांनी इतर धर्मांच्या लोकांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. वारशाने मिळालेल्या काही बाबी आणि आस्था यामुळे हे घडले आहे, अशे ओबामा यावेळी म्हणाले. आज जर गांधीजी असते तर देशातील लोकांची अशा प्रकारची असहिष्णु वागणूक पाहून त्यांनाही धक्का बसला असता. कारण त्यांनी भारताला उदारमतवादी बनण्यात मदत केली होती, अशा शब्दांत ओबामा यांनी भारतातील धार्मिक वातावरणाचा उल्लेख केला आहे.
बराक ओबामा यांनी भारत दौऱ्यादरम्यान दिल्लीत विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्यावर वक्तव्य केले होते. त्यांच्या या भाषणानंतर हा भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण व्हाईट हाऊसतर्फे कालच हे वक्तव्य कोणत्याही एका पक्षाबद्दल नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. व्हाइट हाऊसकडून आलेल्या स्पष्टीकरणाच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा ओबामांचे हे वक्तव्य समोर आल्याने पुन्हा एकदा भारतातील धार्मिक तणावाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये विविध धर्मांकडून इथर धर्मियांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा उल्लेख करताना ओबामा यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे.