आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराष्ट्र धोरणाला नवी दिशा देण्यासाठी ओबामांचा दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ख्रिसमसच्या सुट्यांनंतर हवाईहून येथे दाखल झाले आहेत. ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्या नववर्षातील पहिल्या विदेश दौऱ्याचा प्रारंभ भारतापासून होत आहे. ओबामा आणि केरी दक्षिण आशियात भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला भेट देणार आहेत. भारताच्या दौऱ्यात उभय देशांतील संबंध बळकट होणार नाहीत, तर या उपखंडातील देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला योग्य संदेश दिला जाईल, अशी आशा व्हाइट हाउसने जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

भारत दौऱ्याच्या तयारीला या आठवड्यात वेग येईल. ओबामा २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येत आहेत. जॉन केरी व्हायब्रंट गुजरात परिषदेसाठी अहमदाबादला जाणार आहेत. त्यानंतर ते पाकिस्तान दौऱ्यावर जातील. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि सीईओ अब्दुल्लाह अब्दुल्लाह फेब्रुवारी महिन्यात व्हाइट हाऊसमध्ये ओबामांची भेट घेऊन चर्चा करतील. मात्र, केरी यांचा भारत, पाकिस्तान आणि घनी यांच्या अमेरिका दौऱ्याची औपचारिक घोषणा अद्याप झाली नाही.

ओबामांचा दुसरा दौरा
बराक ओबामा २००८ मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांची फेरनिवड झाली. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी भारताला भेट दिली होती. यानंतर त्यांचा हा दुसरा दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे ते पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. दोनदा भारताला भेट देणारे ते पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकी घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाला या पदाची तिसऱ्यांदा निवडणूक लढवता येत नाही.
भारत शांततेचा मूलाधार : भारत हा शांतता व स्थैर्याचा मूलाधार आहे, अशी ओबामा यांची भावना आहे. आशिया-प्रशांत प्रदेशातील स्थैर्यामध्ये भारत आगामी दशकात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जगातील समस्या सोडवण्यासाठी दोन देशांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. यामध्ये वातावरण बदल, दारिद्र्यनिर्मूलन आणि दहशतवादाचे उच्चाटन या विषयात समान धोरण अवलंबण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे.

मोदींना दोन्ही देशांच्या उद्देशाची जाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत आणि अमेरिकेच्या समान उद्देशांची जाण आहे, अशी जाणीव येथील अधिकाऱ्यांमध्ये आहे. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास असल्यामुळेच ओबामा यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले. विशेष म्हणजे या दिवसांत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष याच काळात काँग्रेसमध्ये देशाला उद्देशून भाषण करत असतात. वर्षातील हे सर्वात महत्त्वाचे भाषण असते.

पाकला क्लीन चिट
पाकिस्तान लष्कर-ए-तोयबासारख्या अतिरेकी संघटनांविरोधात करत असलेली कारवाई पुरेसी असल्याची अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. केरी-लुगर विधेयकाअंतर्गत ही मदत दिली जाते. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला महत्त्व देण्यात आले होते. पाकिस्तानला आता दरवर्षी १.५ अब्ज डॉलर मदत मिळू शकेल.