आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Objection Over The Participation Of Iran On The Syria Issue

सिरियातील हिंसाचारबाबत होत असलेल्या बैठकीत इराणच्या सहभागावरून वादंग, अमेरिकेचा आक्षेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - सिरियातील हिंसाचार सोडवण्यासाठी या आठवड्यात होणा-या बैठकीचे निमंत्रण इराणला दिल्यावरून वादंग निर्माण झाले आहे. अमेरिकेने त्यावर आक्षेप नोंदवला आहे तर इराण सहभागी झाल्यास बैठकीला हजर राहणार नसल्याचा इशारा सिरियातील बंडखोरांनी दिला आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन रविवारी सायंकाळी ही माहिती दिली. त्यानंतर अमेरिका आणि सिरियातील बंडखोरांनी निषेध व्यक्त केला. इराणला शांती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यामुळे इराणला वाटाघाटीच्या प्रयत्नात सहभागी करून घेण्यात काहीही हरकत नाही, यावर आपला विश्वास त्याचबरोबर प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी निकोप वातावरण निर्मिती देखील यातून होईल. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून त्याची सोडवणूक अशाच वातावरणातून होऊ शकते, असा विश्वास मून यांनी व्यक्त केला होता. इराणचे परराष्ट्र मंत्री जावाद झरीफ यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून चांगले संभाषण झाले आहे. त्यानंतर इराणच्या भूमिकेवर विचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बुधवारच्या बैठकीकडे लक्ष ?
सिरियातील पेच सोडवण्यासाठी काही प्रमुख राष्ट्रांची बैठक स्वित्झर्लंडमधील माँट्रेक्स येथे बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. जीनिव्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत सिरियातील हिंसाचारावर तोडगा निघेल का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. 2012 पासून इराणचा बैठकीतील सहभाग हा दीर्घ चर्चेचा विषय राहिला आहे. बुधवारी होणा-या बैठकीत 30 देश सहभागी होतील. ही बैठक दोन दिवस चालेल.
बंडखोरांचे ट्विट
सिरियातील पेच सोडवण्यासाठी इराणला शांती चर्चेत सहभागी करून घेण्यात आले तर आम्ही बैठकीत सहभागी होणार नाही. मून यांनी इराणचे निमंत्रण रद्द करावे, अन्यथा जीनिव्हातील बैठकीला आम्ही हजेरी लावू शकणार नाहीत, असा इशारा सिरियातील विरोधकांकडून ट्विटरवर पाठवण्यात आला आहे.
नेमके काय घडले ?
बान की मून आणि इराणचे परराष्ट्रमंत्री जावाद झरीफ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संभाषण सुरू होते. इराणला शांती प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यामुळे इराणला विधायक भूमिकेसाठी सहभागी करून घ्यावे, अशी विनंती झरीफ यांनी मून यांच्याकडे केली होती. झरीफ यांनी चर्चेच्या विषयाचे गांभीर्य असल्याचे मून यांच्याशी बोलताना सांगितले. निमंत्रक असल्यामुळे आपण इराणला चर्चेत सहभागी करून घेतल्याचे मून यांनी स्पष्ट केले आहे.
चिंतेचा विषय
शांती चर्चेत इराणला सहभागी करून घेण्याचा निर्णय खरोखरच चिंतेचा आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. जीनिव्हामध्ये 30 जून 2012 मध्ये झालेल्या बैठकीत ठराव झाला होता. त्यात सत्ता सूत्रे हस्तांतरणाचा मुद्दा समाविष्ट होता. हा ठराव दोन वर्षांपूर्वी इराणने स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यावरून अमेरिकेला इराणच्या बदललेल्या भूमिकेवर विश्वास नाही. जोपर्यंत इराण जाहीरपणे त्या ठरावाला स्वीकारत नाहीत. तोपर्यंत ही भूमिका निरर्र्थक आहे, असा आक्षेप अमेरिकेने घेतला आहे.
आण्विक कराराची अंमलबजावणी सुरू
तेहरान । देशातील महत्त्वाच्या युरेनियम प्रकल्पाचे काम थांबवण्यात आल्याचा दावा इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीकडून करण्यात आला आहे. बाँबच्या निर्मितीसाठी लागणा-या 20 टक्के युरेनियमच्या उत्पादनाला थांबवण्यात आले आहे. नातांझ येथील प्रकल्पाचे काम स्थगित झाले आहे.