आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराची आठवण काढणारा आधिकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटडा (उदयपूर) - आयएएस अधिका-याने अधिकाराचा गैरवापर करण्याची आणि त्याबद्दल त्याची कानउघाडणी होण्याची एक वेगळीच घटना राजस्थानमध्ये घडली. भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी होलियान गुइटे यांना उदयपूर जिल्ह्यातील कोटडा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून पाठवण्यात आले. मणिपूर राज्यातील लमका गावचे रहिवासी असलेल्या गुइटे यांना आपल्या गावाची खूपच आठवण येत असे.

वसतिगृहावर राहणारे किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी कुटुंबीयांची आठवण म्हणून त्यांचा एखादा फोटो आपल्या खोलीत लावतात. गावाची आठवण जपणा-या वस्तूही या विद्यार्थ्यांच्या खोलीत पाहायला मिळतात. गुइटे साहेबांनी मात्र या सर्व उपायांवर कडी केली. आपल्या गावाची आठवण म्हणून त्यांनी चक्क कोटडा परिसरात मैलाच्या दगडांवर ‘लमका’ गावाची नोंद करवून घेतली. कोटडा परिसरात मैलाचे दोन दगड तसेच एका फलकावर ‘लमका’ गावाचे नाव व अंतर झळकले आणि गुइटे साहेबांचा होमसिकनेस काहीसा कमी झाला.

विशेष म्हणजे गुइटे साहेबांचे हे लमका गाव कोटडा गावापासून तब्बल 3080 किलोमीटर अंतरावर आहे. नियमानुसार हजारो किलोमीटर अंतरावरील खेड्याचे नाव मैलाच्या दगडावर टाकता येत नाही. दैनिक भास्कर समूहाच्या स्थानिक आवृत्तीने ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यातच आपल्या गावाचे नाव मैलाच्या दगडांवर लिहिण्यासाठी गुईटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर दबाव टाकल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांनी गुइटेंची कानउघाडणी केली आणि पुन्हा असा प्रकार न करण्याची तंबी दिली. मैलाच्या दगडावरून लमका गावाचे नाव व अंतर पुसून टाकण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात आली. विभागाने तत्काळ अंमलबजावणी केली. ही चूक प्रशिक्षणकाळात झाली असून, अशा चुका होऊ नयेत यासाठीच प्रशिक्षण दिले जात असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

काय आहे नियम?
इंडियन रोड्स काँग्रेसच्या नियमांनुसार राज्य तसेच राष्ट्री य महामार्गांसह कोणत्याही दोन गावांना जोडणा-या रस्त्यांवर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर एक मैलाचा छोटा दगड तर पाच किलोमीटर अंतरावर मोठा दगड रोवलेला असतो. छोट्या दगडांवर त्या रस्त्यावर लागणारी गावे किंवा खेड्यांचे नाव व अंतर दिलेले असते तर मोठे शहर किंवा जिल्ह्याचे मुख्यालय व अंतरासाठी मोठा दगड असतो. दूरच्या शहरांचे अंतरही दिलेले असते, पण ती मोठी आणि राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची शहरे असणे आवश्यक आहे.