आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One British Citizen Arrested In The Connection With Nairobi Terrorist Attack

नैरोबीतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एका ब्रिटिश नागर‍िकाला अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी - केनियाची राजधानी नैरोबीतील वेस्टगेट शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एका ब्रिटिश नागरिकाला अटक करण्यात आली आहे. तुर्कस्तानमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना नैरोबी विमानतळावर सोमवारी त्याला अटक करण्यात आली. 35 वर्षीय युवकाला अटक करण्यात आल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.


सोमालियन वंशाच्या ब्रिटिश नागरिकाला त्याचे विमान सुटल्यानंतर नैरोबी विमानतळावर अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात आली, असे केनिया पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने म्हटले आहे. मात्र, त्यांनी त्याचा सविस्तर तपशील दिला नाही. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा वेस्टगेट शॉपिंग मॉलवर पूर्णत: नियंत्रण मिळवण्यात यश आले. या हल्ल्यात एका तरुणीसह सहा ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भारतीय वंशाचे ब्रिटिश कला दिग्दर्शक समीर भामरा यांच्या चार नातेवाइकांचा समावेश आहे.


केनिया सरकारने या हल्ल्यात 67 जण मृत्युमुखी पडल्याला दुजोरा दिला आहे, तर स्फोटात 137 ओलिस मारले गेल्याचा दावा अल-शबाब या अतिरेकी संघटनेने केला आहे. केनियाच्या लष्कराने मॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचा आरोपही अल-शबाबने केला आहे. मात्र, या आरोपाला दुजोरा मिळू शकला नाही. या हल्ल्यानंतर अद्यापही 63 जण बेपत्ता असल्याचे रेडक्रॉसने म्हटले आहे.


तीन मजले जमीनदोस्त
भीषण स्फोट आणि आगीमुळे वेस्टगेट मॉलचे तीन मजले पूर्णत: जमीनदोस्त झाले आहेत. शेवटच्या स्फोटात पाच अतिरेकी मारले गेले, तर 11 संशयितांना अटक करण्यात आली.


ओळख पटवण्यासाठी न्यायवैद्यक चाचणी

मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांची न्यायवैद्यक तपासणी आणि डीएनए चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवली जाईल, असे केनियाचे अध्यक्ष उहरू केन्याटा यांनी सांगितले.


राजकीय दुखवटा जाहीर
केनियामध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.