आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ एक अर्ज करा अन् थेट मंगळावरच राहायला जा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पृथ्वीवरच्या रटाळ वातावरणाचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही फक्त एक अर्ज करून मंगळावर राहण्यास जाऊ शकता. हॉलंडची मार्स वन ही कंपनी तुमच्यासाठी ही संधी घेऊन आली आहे. मंगळावर राहण्यास इच्छुकांकडून कंपनी अर्ज मागवत आहे. खगोलशास्त्रातील रहस्ये उलगडण्यात रस असलेल्यांसाठी ही चांगली संधी आहे.


यामध्ये फक्त एक अडचण आहे, कंपनी तुम्हास मंगळावर नेऊन सोडेल, पण परत आणण्याची मात्र काहीही शाश्वती नाही. हा धोका लक्षात आल्यावरही हजारो लोकांनी मंगळावर जाण्यासाठी कंपनीकडे अर्ज केल्याचे मार्स वनकडून सांगण्यात आले आहे. मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे. 2018 पर्यंत ती पूर्र्णत्वास जाण्याची आशा वर्तवली जात आहे. मार्स वनचे सह संस्थापक बॅस लॅन्सडोर्प यांनी या प्रवासाबाबत सांगितले की, पृथ्वी ते मंगळ या सात - आठ महिन्यांच्या प्रवासात अंतराळप्रवाशांचे वजन कमी होईल. मंगळावरील अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणात राहिल्यानंतर या नागरिकांना पृथ्वीवरील वातावरणाशी जुळवून घेणे शक्य होणार नाही, असे लॅन्सडोर्प यांनी सांगितल्याचे बीबीसीने म्हटले आहे. एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी निधी उभारणे हे मोठे आव्हान असल्याची टीकाही आयोजकांवर होत आहे.


अशी होईल निवड
मंगळावर जाण्यास इच्छुक अर्जदारांना रिअ‍ॅलिटी शोप्रमाणे एक निवड प्रक्रियेतून जावे लागेल. याचे टीव्हीवर प्रक्षेपण होईल. निवड झालेल्या अर्जदारांना शारीरिक व मानसिक प्रशिक्षण दिले जाईल. हे लोक मंगळावर सध्या उपलब्ध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सौर ऊर्जा निर्माण करतील, पाण्याचा पुनर्वापर करतील. मातीतून पाणी मिळवले जाईल. अंतराळवीर स्वत:च अन्न शिजवतील, त्यांना संकटकालीन शिधा पुरवला जाईल. दर दोन वर्षांनी त्यांची नव्या सहका-यांशी गाठ पडेल.


मोहिमेवर शंकेचे ढग
आयोजकांची एवढी तयारी असली तरी जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी या मोहिमेच्या यशाबाबत शंका व्यक्त केली आहे. मंगळावरील अतिथंड वातावरण राहण्यायोग्य नाही. वातावरण अत्यंत विरळ असल्याने सूर्याची किरणे थेट पृष्ठभागावर पडतात. पाणी गोठलेल्या अवस्थेत किंवा पृष्ठभागाखाली आहे. किरणोत्सर्गाचे प्रमाण अत्याधिक आहे. तापमान झपाट्याने बदलते. तेथे जाणारे लोक जास्त काळ जगतील की नाही याबाबतही शास्त्रज्ञांना शंका वाटते.