आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक: आऊटसोर्सिंग कंपन्यांवर अमेरिकेचा वरवंटा, विधेयक सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- सहा खासदारांच्या द्विपक्षीय गटाने अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहात आऊटसोर्सिंगविरोधी विधेयक सादर केले. विधेयक मंजूर झाल्यास येथील कंपन्यांना भारतासह अन्य देशांतून कॉल सेंटर्सचे काम करून घेता येणार नाही.

यूएस कॉल सेंटर अ‍ॅँड कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट ऑफ 2013 नावाचे विधेयक टीम बिशप यांनी सादर केले. विधेयक मंजूर झाल्यास येथील कंपन्यांना कॉल सेंटर्सच्या कामाची आऊटसोर्सिंग करता येणार नाही. डेव्ह मॅक्किनली, ख्रीस गिबसन, जेन ग्रीन, माईक ग्रीम आणि माईक मिचुंड या अन्य खासदारांच्या विधेयकावर स्वाक्षर्‍या आहेत. 2011 मध्ये 135 जणांच्या गटाने सादर केलेले अशाच पद्धतीचे विधेयक फेटाळण्यात आले होते. या विधेयकातून स्थानिक ग्राहकांशी संबंधित परदेशात कार्यरत कॉल सेंटर्समधील माहिती अमेरिकेतील संस्थेत वळवण्याचा हक्क नागरिकांना मिळेल. परदेशात रोजगाराचे आऊटसोर्सिंग करणार्‍या कंपन्यांवर श्रम मंत्रालयाची निगराणी राहील. यात दोषी आढळणार्‍या कंपन्यांना सरकारचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने तीन वर्षे कर्ज मिळणार नाही. कॉल सेंटर्समधील रोजगार स्वदेशात आणणार्‍या कंपन्यांना करसवलत दिली जाईल.

उद्योग वाढवणार्‍यांना पाठिंबा राहणार
तुम्ही (कंपन्या) अमेरिकेबाहेर रोजगार नेल्यास, येथील करदाते तुमच्याकडे पाठ फिरवतील. आम्हा द्विपक्षीय आघाडीतील खासदारांचा एक आवाज असून देशात रोजगार निर्मिती करणार्‍या चांगल्या अमेरिकी उद्योजकांना करदात्यांचा पाठिंबा राहील, असे बिशप यांनी स्पष्ट केले. या विधेयकामुळे कंपन्या परेदशात रोजगार वळवणार नाहीत, असे मॅक्किनली म्हणाले.

रोजगार बाहेर गेल्यास आर्थिक मदत नाही
अमेरिकेमध्ये रोजगारनिर्मिती होण्याबरोबर आहेत ते रोजगार कायम राहावेत, अशी आमची इच्छा आहे. या विधेयकामुळे बाहेर जाणारे हजारो रोजगार वाचतील. सर्व कॉल सेंटर्स अमेरिकेत असावेत यासाठी कंपन्यांवर दबाव नाही. मात्र, अमेरिकेबाहेर रोजगार जात असतील तर त्यांना सरकारची आर्थिक मदत मिळणार नाही, असे मॅक्किनली यांनी सांगितले. यूएस कॉल सेंटर अ‍ॅँड कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्टला सात लाख सदस्यीय कम्युनिकेशन वर्कसचा पाठिंबा आहे.

भारताकडून सबआऊटसोर्सिंग
प्राइसवॉटर हाऊसकूपर्सने केलेल्या अभ्यासात भारतात आऊटसोर्सिंग करणार्‍या 83 टक्के कंपन्यांनी गेल्यावर्षी माहिती सुरक्षेचे उल्लंघन केले आहे. भारतातील कॉल सेंटर कंपन्या इजिप्त, मेक्सिको, झेक प्रजासत्ताक, चीन आणि थायलंडमध्ये सबआऊटसोर्सिंग करत असल्याचे बिशप यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.