आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक अध्यक्षांचा मुलगा बिलावल रुसून दुबईत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद, लाहोर - पिता आणि राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींसोबत पाकिस्तानी पीपल्स पार्टीच्या कारभारावरून तीव्र मतभेद झाल्यामुळे बिलावल भुत्तो-झरदारी दुबईला निघून गेले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बिलावल रुसल्याने पीपीपीला स्टार प्रचारकाची उणीव भासणार आहे.

बिलावल यांची नुकतेच पक्षाचे ‘प्रमुख आश्रयदाते’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान बेनझीर आणि भुत्तो घराण्याचे राजकीय वारसदार म्हणून बिलावल यांच्याकडे पाहिले जाते. मात्र पक्षाच्या कारभारात त्यांची आत्या आणि झरदारींची बहीण फरयाल तलपूर यांचाच शब्द प्रमाण मानला जातो. तसेच झरदारीही फरयाल यांनाच अधिक महत्व देत असल्याने बिलावल नाराज झाले आहेत. पाकिस्तानात येत्या 11 मे रोजी सार्वत्रिक निवडणूका होत आहेत.भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कोर्टकज्जे पाठी लागल्याने झरदारी थेट प्रचारात उतरू शकत नाहीत. शिवाय तेहरिकचा नेता इम्रान खान तरुणांना आकर्षित करीत असताना बिलावल हा पीपीपीसाठी हुकमी एक्का ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे देश सोडून निघून जाणे पक्षासाठी अडचणीचे ठरत आहे.


आत्याबार्इंचा मनमानी कारभार
गेल्या महिन्यात बिलावल यांनी पीपीपीच्या 200 कार्यकर्त्यांना नोक-यांसाठी सिंधचे मुख्यमंत्री कैम अली शाह यांच्याकडे पाठवले होते, परंतु आत्याबार्इंनी मध्येच हस्तक्षेप करून हे काम हाणून पाडले. त्यानंतर बिलावल यांनी शिफारस केलेल्या सिंधमधील कार्यकर्त्यांना फरयाल यांनी तिकिटे नाकारली. त्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट वाढले.


मतभेदाचे प्रमुख मुद्दे
* आत्या फरयाल तालपूर यांचा वाढता हस्तक्षेप
* दहशतवाद, वांशिक संघर्षाबद्दल पक्षाची मिळमिळीत भूमिका
* निवडणुकीच्या तिकीट वाटपात समर्थकांना डावलले


झरदारींशी भांडण
मलाला युसूफझाईवरील आणि क्वेट्टा, कराची येथील शिया मुस्लिम समुदायावरील हल्ल्यांची प्रकरणे पक्षाने प्रभावीपणे हाताळली नाहीत. वांशिक हल्ल्यात 250 शिया मुस्लिम मारले गेले होते. तसेच तेहरिक-ए-इन्साफने तरुणांना आकर्षित करणा-या अनेक मुद्द्यांवर जोरदार आघाडी उघडली असताना पीपीपीने मात्र काहीही केलेले नाही.


अपशकुन
सिंध प्रांतातील गढी खुदा बक्श हा भुत्तो परिवाराचा बालेकिल्ला समजला जातो. 4 एप्रिल रोजी तिथूनच पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असून त्या सभेला बिलावल उपस्थित राहणार नाहीत. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे ते फोनवरून भाषण करणार असल्याचे पीपीपीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.


लष्कराविना निवडणूक
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ क यानी यांनी मंगळवारी काळजीवाहू पंतप्रधान मीर हजरखान खोसो यांची भेट घेतली. सुरक्षा व्यवस्थेबद्दल त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. सरहद्दीवर तसेच दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये तुकड्या गुंतल्या असल्याचे लष्कराने सांगितले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस केवळ संवेदनशील भागातच तुकड्या तैनात करण्याबाबत विचार सुरू आहे. असे झाल्यास लष्कराच्या निगराणीशिवाय पार पडलेली पाकिस्तानच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरणार आहे.