मुझफ्फराबाद - सीरिया आणि
इराकच्या धर्तीवर भारतातही ग्लोबल जिहाद पुकारण्याची घोषणा पाकिस्तानातील 16 हून अधिक दहशतवादी संघटनांनी दिली आहे. युनायटेड जिहाद काउंसिल (यूजेसी) असे या दहशतवादी समुहांच्या संघटनेचे नाव आहे. इंग्रजी दैनिक मेल टुडेच्या वृत्तानुसार,
इराकच्या धर्तीवर काश्मीर स्वातंत्र्यासाठी जिहाद पुकारला गेला पाहिजे, अशी मागणी करत तालिबान, अल-कायदा आणि जगातील इतर अनेक दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. यूजेसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटींवरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे, की मोदी आणि शरीफ यांच्या शाल आणि साडी भेटीने काश्मीरींच्या भावना दुःखावल्या जात आहेत.
काश्मीरमध्ये ग्लोबल जिहादची मागणी
पाकव्याप्त काश्मिरची राजधानी मुझफ्फराबाद मध्ये झालेल्या एका सभेत यूजेसीचा अध्यक्ष सैय्यद सलाहुद्दीन म्हणाला, 'अल-कायदा, ता्लिबान आणि इतर संघटना जर काश्मीर देशाच्या मदतीसाठी पुढे आल्या तर त्यांचे स्वागत आहे. काश्मीरात रोज होणार्या हत्या, महिलांची छेडछाड आणि जाळपोळ. तसेच सहा हजारांहून अधिक निनावी कबर या भारतीय लष्कराच्या अत्याचाराची साक्ष आहे. त्यांनी काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा कोणताच पर्यात शिल्लक उरत नाही. त्यामुळे आपण जे शत्रुशी दोन हात करु शकतील अशा लोकांचे स्वागत केले पाहिजे.' 13 जुलैला शहीद दिवसाच्या निमीत्ताने सलाहुद्दीनने हे भाषण केले.
कसला शहीद दिवस
डोगरा शासनाने 1931 मध्ये 20 मुस्लिमांची हत्या केली होती. त्याच्या स्मृतीत पीओकेमध्ये दरवर्षी शहीद दिवस साजरा केला जात आहे.
मोदी - शरीफ भेटीवर टीका
सलाहुद्दीनने नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्या भेटीला विशेष लक्ष्य केले. तो म्हणाला, 'नवाज शरीफ यांनी काश्मीरींच्या भावनांची आणि बलिदानाची कदर केली पाहिजे. त्यांची मोदींविषयीची एकतर्फी नरमाईची भूमिका आमि पत्र व साडी भेट देण्यामुळे काश्मीरींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे आंदोलनावर वाईट परिणाम होत आहे.' सलाहुद्दीन याने पाकिस्तानला इशारा देताना म्हटले आहे, की आमच्या इच्छेविरुद्ध तुम्ही कोणताही निर्णय घेतला नाही पाहिजे. आम्ही असे निर्णय स्विकारणार नाही.
सलाहुद्दीन याने हुर्रियत कॉन्फ्रन्सवरही निशाणा साधला. तो म्हणाला, 'फक्त काही पर्याय आणि मुद्यांविरोधात आवाज उठवण्यापेक्षा हुर्रियत नेत्यांनी दडपशाहीविरोधात आमच्यासोबत येऊन आवाज बुलंद केला पाहिजे. भारतासोबत शेकडोवेळा चर्चा झाली मात्र, त्यातून काहीही साध्य झालेले नाही.'
छायाचित्र - युनायटेड जिहाद काउंसिल (यूजेसी)चा अध्यक्ष सैय्यद सलाहुद्दीन
पुढील स्लाइडमध्ये, कोण आहे सैय्यद सलाहुद्दीन?