इस्लामाबाद- पुढील आठवड्यात काठमांडू येथे होणाऱ्या सार्क परिषदेनिमित्त भारताने पुरवलेली बुलेटप्रूफ कार पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नाकारल्याचे वृत्त पाकिस्तानने फेटाळले आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव
आपल्यापर्यंत आलाच नाही, त्यामुळे कार नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण पाक परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लाम यांनी दिले आहे. पुढील आठवड्यात शरीफ काठमांडू येथील परिषदेत सहभागी होतील, असेही तस्नीम यांनी सांगितले.
नवाझ शरीफ यांनी नेपाळ दौऱ्याकरिता भारताची बुलेटप्रूफ कार नाकारली असून ते स्वत:च्या कारने काठमांडूत येतील, असे वृत्त नेपाळमधील अधिकृत सूत्रांनी दिले होते. सार्क परिषदेकरिता येणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांसाठी भारताने सहा बुलेटप्रूफ कार नेपाळला पाठवल्या आहेत. २६ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नेपाळची राजधानी काठमांडू येथे सार्क परिषद होणार आहे.